फांगणे गावात ६० ते ७० वयोगटाच्या महिलांना शिक्षणाचे धडे

वर्ग आहे, पाटीपेन्सिल आहे, दप्तरही आहे आणि गणवेशही आहे पण, शाळेत शिकणारे विद्यार्थी कोवळय़ा वयातील मुले नसून आयुष्याचा पुरेपूर अनुभव घेतलेल्या आजीबाई आहेत. मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात भरणारी आजीबाईंची शाळा सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. ६० ते ७० वयोगटातील महिला गुलाबी रंगाची साडी परिधान करून दररोज या शाळेत हजेरी लावून अभ्यासाचे धडे गिरवतात. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर यांनी  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी गावातील वयोवृद्ध महिलासह स्थापन केलेल्या या शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षणापासून दूर राहिलेल्या ग्रामीण भागातील महिलांना लेखन, वाचनाची आद्याक्षरे तरी गिरवता यावीत यासाठी अनेक ठिकाणी प्रौढ साक्षरता वर्ग भरवण्यात येतात. परंतु, रोजची कामे, कुटुंबाची देखरेख  किंवा शिक्षणाविषयीची अनास्था यांमुळे अशा वर्गाना नियमित हजेरी लावणाऱ्यांची संख्या कमी असते. परंतु, फांगणे गावातील साक्षरता वर्गात मात्र, याच्या नेमके उलटे चित्र पाहायला मिळते. शाळेत महिलांना  मुळाक्षरे, अंकगणित आणि चित्र काढायला शिकवले जाते, गृहपाठ दिला जातो. शिक्षणासोबतच महिलांना शिवणकाम आणि कागदी पिशवी तयार करण्यास शिकवले जाते.

मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या शाळेत आसपासच्या खेडय़ांमधील वयोवृद्ध महिलाही पायपीट करत येताना दिसू लागल्या आहेत. हे चित्र स्वागतार्ह असल्याचे मत ही शाळा सुरू करण्यासाठी मदत करणारे मोतीराम दलाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.