News Flash

उद्ध्वस्त संसार आणि नातलगांचा आक्रोश!

मातीचा ढिगारा, त्यात उद्ध्वस्त झालेले संसार, आत अडकलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी चाललेली धडपड, मृतांचा नातेवाईकांचा आक्रोश..

| July 30, 2015 03:12 am

मातीचा ढिगारा, त्यात उद्ध्वस्त झालेले संसार, आत अडकलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी चाललेली धडपड, मृतांचा नातेवाईकांचा आक्रोश.. हे वातावरण हेलावणारे चित्र होते ठाकुर्लीतील मीरानगर परिसराचे. येथील मातृछाया ही तीन मजली इमारत कोसळल्यानंतर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आपल्याने नातेवाईकाला शोधण्यासाठी एकच धडपड सुरू होती. जखमी झालेल्याला तात्काळ रुग्णालयात नेले जात होते, तर आपला नातेवाईक मृत झाल्याची बातमी कळताच अश्रूंचा बांध फुटत होता.
ठाकुर्ली पूर्वेतील मीरानगर परिसरातील मातृकृपा ही तीन मजली इमारत मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. इमारतीत २० कुटूंबे राहात होती. इमारतीचा जिन्याकडील भाग हा कमकुवत झाला असल्याने रात्री तो अचानक कोसळला. दोन दिवस आधी इमारतीच्या जिन्याकडील प्लॅस्टर तसेच तेथील बांधकामाची पडझड होण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुघटना घडल्याचे बचावलेल्या काही व्यक्तींनी सांगितले.
इमारतीचा भाग कोसळू लागताच काही रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. काहींनी गॅलरीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणात हे सर्व घडल्याने ते जखमी झाले. इमारत कोसळताच स्थानिक रहिवाशांनी धाव घेत ढिगाऱ्यात अडकलेल्या चार जणांना तत्काळ बाहेर काढले. परंतु नंतर बघ्यांची गर्दी जास्त झाल्याने बचावकार्यात अनेक अडथळे आले. पालिकेचे कर्मचारी अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले, मात्र तोकडी यंत्रणा असल्याने लागलीच बचावकार्यास सुरुवात करता आली नाही.
बृहमुंबई अग्निशमन दल, तसेच नवी मुंबई येथील रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स दाखल झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जिवंत व्यक्तीचा प्रतिसाद मिळताच नागरिक त्यांना स्फुरण देण्यासाठी गणपती बप्पा मोरया असे बोलून त्यांची हिंमत वाढवित होते. पावसाचा अडथळा मध्ये जाणवत असला तरी बचावकार्य थांबविण्यात आले नाही. पहाटे पाचपर्यंत दहा जखमींना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

भावना अनावर
* या दुर्घटनेत इमारतीत राहणारे यादव कुटुंबीय सुखरूप बचावले. ‘‘आम्ही गेली १६ वर्षे येथे रहात आहोत. इमारत कोसळत आहे याची जाणीव होताच आम्ही सर्वानी बाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने बचावलो. आमचा संसार उद्ध्वस्त झाला असला, तरी कुटुंबातील सर्व सदस्य वाचल्याने देवाचे आम्ही आभार मानतो,’’ अशी भावना उर्मिला यादव यांनी व्यक्त केली.
* प्रतिक झांझारिया या दहा वर्षीय मुलाने मोबाइलवर फोन करून आपण स्वयंपाकघरात अडकलो असल्याचे मित्रांना कळविले. मात्र ढिगारा हलविताना त्याच्या अंगावर काही भाग कोसळल्याने त्यात त्याचा अंत झाला.
* महेंद्र शर्मा हा चार महिन्यापूर्वीच वडील व भाच्यासोबत येथे राहण्यास आला होता. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्याने गच्चीवरुन उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या अंगावर इमारतीचा भाग कोसळून त्यात तो जखमी झाला. या घटनेत त्याचे वडील व भाचा हे दोघेही मरण पावले आहेत.
* तेजश्री शेणवी यांनी या घटनेत आपली आई गमावली. आई आजारी असल्याने बिछान्याला खिळून होती. तिला हालचाल करता येत नव्हती. अशाप्रकारे आमच्या आईचा अंत होईल, असे कधी वाटले नव्हते, हे सांगताना तेजीला अश्रू आवरणे कठीण झाले.

कागदपत्रे, दागिने शोधासाठी धडपड
या दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याने आपली महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यासाठी काही नागरिक जिवाचा आटापिटा करत होते. सकाळी दहा नंतर बाजूला काढण्यात आलेल्या ढिगाऱ्यात आपली कागदपत्रे, दागिने शोधण्यासाठी काही नागरिकांना सोडण्यात आले. यावेळी मोडतोड झालेल्या घराचे ढिगारे पाहून अनेकांचा बांध फुटत होता.
मुंब्रा, डॉकयार्ड दुर्घटनेच्या आठवणी ताज्या
ठाकुर्ली चोळेगाव परिसरातील मातृछाया ही तीन मजली इमारत कोसळल्यानंतर मुंब्रा-शिळफाटा आणि मुंबईतील डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनांच्या घटना ताज्या झाल्या. दोन वर्षांपूर्वी मुंब्रा येथील अनधिकृत इमारत कोसळून ७४ जणांना प्राण गमावावे लागले होते, तर डॉकयार्ड रोड येथील दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचेही मोलाचे सहकार्य
महापालिका डॉक्टरांच्या पथकाने दुर्घटनेनंतर घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर प्राथमिक उपचार करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने अनेक जखमी नागरिक आपल्या नातेवाईकांची चौकशी परिचारिका तसेच डॉक्टरांकडे करत होते. डॉक्टरांनी या जखमींना मानसिक आधार देण्याचे कामही केले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे या घटनास्थळी रात्रीपासून दाखल होत्या.
मदतीसाठी सारे धावले!
डोंबिवली :  ठाकुर्ली येथे इमारत कोसळल्याचे वृत्त आसपासच्या शहरांमध्ये वाऱ्यासारखे पसरले आणि मदतकार्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल नेटवर्किंगचा यासाठी प्रभावी वापर करण्यात आला. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून यासंबंधीचे वृत्त, विविध माहिती, छायाचित्रे पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी वाढू लागली. स्थानिक नागरिकांसह परिसरातील तरुण मंडळी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विविध मंडळांचे कार्यकर्ते घटनास्थळी धावल्याने त्यांची प्रशासकीय यंत्रणांना मोठी मदत झाली.
* अग्निशमन दलातील निवृत्त अधिकारी सदाशिव माने यांना हे वृत्त समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून साधनसामग्री घेत त्यांनी क्षणाचा विलंब न लावता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे काम सुरू केले. अशा घटना घडताच योग्य नियोजन व तात्काळ कारवाई केली तर अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो, अशी प्रतिक्रिया माने यांनी दिली.
* ईगल ब्रिगेड तसेच दक्ष नागरिक सुप्रिया कुलकर्णी यांनी रात्रभर नागरिकांना तसेच पोलिसांना विविध सूचना देत सहकार्य केले. जिवंत व्यक्ती मिळताच नातेवाईकांनी गोंधळ घालू नये, तसेच बघ्यांची गर्दी हटविणे, पोलिसांना, बचाव पथकाला कोणती मदत हवी असल्यास त्याविषयी सूचना देण्याचे काम त्यांनी केले.
* वृत्तपत्र विक्रेते धनंजय चाळके, भालचंद्र पाटील, पालिकेचे निलंबित कर्मचारी जॉन सॅम्युअल, विनोद देशमुख या स्थानिक तरुणांनी व नागरिकांनी तात्काळ इमारतीत अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यास धाव घेतली.  जखमी व्यक्तींसाठी चादरी तसेच इतर कपडय़ांची व्यवस्था स्थानिक रहिवासी करून देत होते.
* राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही या वेळी एकत्र येत बचावकार्यात सर्वाना मदत करण्याचे काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:12 am

Web Title: thakurli building collapse rescue operation end after 14 hours
Next Stories
1 स्कायवॉकवरती तळे साचे!
2 भूतकाळाचे वर्तमान : ठाण्यातील टपाल यंत्रणेची दीडशतकी सेवा!
3 मिनी मॅरेथॉनमध्ये अडथळ्यांची शर्यत
Just Now!
X