गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. ठाण्यात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झाला आहे.

ठाणे शहरातील २३ हजारांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. शहरात जून महिन्यामध्ये करोनाचा प्रसार सर्वाधिक होता. या काळात शहरातील दाट वस्त्यांमध्ये करोना संक्रमण पसरल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यावेळी शहरात दररोज ४०० हून अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे  आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागली होती.  शहरातील हे करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुन्य कोव्हीड मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने शहरातील करोना चाचण्या आणि प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यावर भर दिला. त्यामुळे जुलै महिन्यापासून शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २०० पेक्षाही कमी झाली.

याच काळात शहरातील आरोग्य व्यवस्थाही सक्षम झाल्याने करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.  २३ हजार रुग्णांपैकी २१ हजार रुग्ण करोनामुक्त झाले असून शहरात सध्या केवळ आठराशे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यामध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ठाणे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात आणखी १,३५३ रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी करोनाचे १ हजार ३५३ नवे  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ८८५ वर पोहोचली आहे. तर, बुधवारी दिवसभरात ३५  करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ३ हजार १४२ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ३६१, नवी मुंबईतील ३२५, ठाणे शहरातील २११, ठाणे ग्रामीणमधील १३६, मीरा-भाईंदरमधील ११५, भिवंडी शहरातील ८२, बदलापूरातील ६३, उल्हासनगरमधील ३४ आणि अंबरनाथमधील २६ रुग्णांचा समावेश आहे.