भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसाद देत भीमसैनिक मोठय़ा संख्येने रस्त्यांवर उतरल्याने बुधवारी ठाण्यासह जिल्ह्यातील सर्वच शहरांतील जनजीवन ठप्प झाले. सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत परिस्थिती सुरळीत असल्याचे पाहून नोकरदार, विद्यार्थीवर्ग घराबाहेर पडला खरा; पण अचानक हे आंदोलन उग्र बनले व रस्ते, रेल्वेवाहतूक विस्कळीत झाल्याने सामान्यांचे प्रचंड हाल झाले. अतिशय आक्रमक घोषणा देत रस्त्यावर उतरलेले भीमसैनिक आणि हतबल दिसणारे पोलीस यांमुळे सर्वच शहरांतील दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली. अशा  अवस्थेत स्थानकाकडे जाण्यासाठी वा घरी परतण्यासाठी कोणतीही वाहतूक सुविधा न मिळाल्याने अनेकांची कोंडी झाल्याचे चित्र बुधवारी ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथे पाहायला मिळाले.

ठाणे, वागळे, घोडबंदर आणि कळवा परिसरात मंगळवारी रात्रीपासून महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर भीमसैनिक रस्त्यावर उतरू लागले होते. घोडबंदर मार्गावरील ब्रह्मांड सिग्नलजवळ टायर जाळण्याचे प्रकार घडल्याने मंगळवार रात्रीपासूनच शहरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे बुधवार सकाळपासूनच महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर सर्वच शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकाळच्या वेळेत शहरातील महामार्गावर वाहनांच्या मोठय़ा रांगा दिसून येतात. परंतु बुधवारी शहरातील महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र, आंदोलकांनी कोपरी, ब्रह्मांड तसेच अन्य भागांत रस्त्यावर ठिय्या मांडत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. वागळेतील इंदिरानगर भागात रस्त्यावर बांबू टाकून तर ब्रह्मांड सिग्नलजवळ पाण्याचे पाइप टाकून वाहतूक अडविण्यात आली होती.

दुसरीकडे, ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, अंबरनाथ शहरात रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक रोखण्याचे प्रकार आंदोलनकर्त्यांकडून झाल्याने येथील वाहतूकही काही काळ बंद पडली होती. बुधवारी दिवसभर शहरात एकही रिक्षा धावताना दिसली नाही. आंदोलनकर्त्यांकडून रिक्षांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक चालकांनी रिक्षा रस्त्यावर काढल्याच नाही. त्यामुळे रस्त्यावर रिक्षांची संख्या फारच कमी होती आणि तेही ठाणे स्थानकाच्या दिशेने येण्यास नकार देत होते. त्यात टीएमटीची बससेवाही बंद झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या शहरांसह ग्रामीण भागामध्येही अशीच काहीशी परिस्थिती होती. कल्याणमध्ये राज्य परिवहन सेवेच्या पाच तर केडीएमटीच्या तीन बसगाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्या.

महिला पोलीस जखमी

बदलापुरात सकाळी ९च्या सुमारास पश्चिमेतील उड्डाणपुलाजवळ रिक्षा रोखणाऱ्या कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत असताना राजश्री नवाळे ही महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. यावेळी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी पश्चिमेतील सहकार हॉटेलसमोर गोंधळ घालत कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे चार कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला होता. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

प्रवाशांची लूट..

मानपाडा ते माजिवाडय़ापर्यंत शेअर रिक्षेने येण्यास साधारण १५ रुपये लागतात. मात्र या बंदमुळे ७० ते ८० रुपये हे रिक्षाचालक प्रवाशांकडून आकारत होते. अनेकांनी माजीवाडा ते ठाणे स्थानकापर्यंत पायी चालत जाण्याचा पर्याय निवडला. वसंत विहार नाका ते नौपाडा येथे येण्यास रिक्षाचालक २०० रुपये आकारत होते. उबर-ओला रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी तर चक्क स्थानक परिसरात तसेच मुंबईकडे जाण्यास नकार दिला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत होते. कामासाठी बाहेर पडलेल्या काही नागरिकांना बंदमध्ये सामील व्हा, घरी जा असे सांगून बंदमध्ये सामील व्हायला प्रोत्साहित करत होते.