News Flash

ठाणे मनोरुग्णालयातील २७ रुग्ण करोना बाधित! १२ इमारती धोकादायक, पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष!

इमारत दुरुस्तीसाठी २४ कोटींचा प्रस्ताव अद्याप मंजुरीविना पडून!

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

संदीप आचार्य, लोकसत्ता

राज्यात वेगाने करोना रुग्ण वाढत असून आता ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात तब्बल २७ मनोरुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. या सर्व करोना बाधित रुग्णांना रुग्णालयातच एका स्वतंत्र वॉर्डमध्ये विलगीकरणाखाली ठेऊन उपचार करण्यात येत आहेत. मुंबई- ठाण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी खाटा मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ३१ मार्च रोजी ठाणे मनोरुग्णालयाच्या वॉर्ड १७ ‘अ’मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाला ताप आल्याचे आढळून आल्यानंतर करोना चाचणीसह रुग्णाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यात रुग्णाला करोना झाल्याचे स्पष्ट होताच वॉर्डमधील सर्व रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. यात २५ मनोरुग्णांना करोना झाल्याचे आढळून आले. या वॉर्डला लागून असलेल्या १७ ‘ब’मध्ये आणखी दोन मनोरुग्णांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोदडे यांनी तात्काळ या सर्व रुग्णांची एका वेगळ्या विभागात व्यवस्था केली. तसेच आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना घटनेची माहिती दिली. डॉ. संजय बोदडे हे स्वत: एमडी फिजिशियन असून यापूर्वी राजभवनात राज्यपालांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

डॉ. बोदडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “हे सर्व रुग्ण करोना लक्षणरहित असल्याने त्यांना करोना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. विलगीकरणाखाली या सर्व रुग्णांवर योग्य ते सर्व उपचार माझ्या देखरेखीखाली सुरु आहेत. या घटनेची माहिती देताच दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉ. साधना तायडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या उपचार व व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच अन्य रुग्णांची योग्य काळजी घेण्यास सांगितले.

एकूण ९८८ रुग्ण उपचारार्थ दाखल

ठाणे मनोरुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये मिळून एकूण ९८८ मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या मनोरुग्णांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात येथे ३३ मनोरुग्णांना करोना झाला होता. यात दोन पुरुष व ३१ महिला मनोरुग्णांचा समावेश होता. तीन दिवसांपूर्वी आढळून आलेले सर्व मनोरुग्ण हे पुरुष असून सर्वांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉ. बोदडे यांनी सांगितले.

सामान्यपणे या रुग्णालयात मानसिक आजारावरील उपचारासाठी रोज साडेतीनशे रुग्ण येतात तथापि करोनामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी रोज २०० रुग्ण मानसिक आजारावरील उपचारासाठी येतात. यात ठाणे, मुंबईपासून थेट कर्जत, कसारा येथून रुग्ण येतात. बरेचवेळा कोल्हापूर व जळगाव येथूनही रुग्ण येत असतात.

रुग्णालयातील इमारती झाल्या धोकादायक

राज्यात व देशात मानसिक आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना वेगवेगळ्या मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागत आहे. नोकरदार वर्ग तसेच महिलांमधील मानसिक ताण वाढत असल्याने ठाणे मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुर्देवाने शंभर वर्षाहून जुने असलेल्या या रुग्णालयातील इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीकडे शासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने मनोरुग्णांच्या तब्बल १२ इमारती अतिधोकादायक बनल्या असून त्या तात्काळ रिकाम्या करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

सध्या यातील इमारत क्रमांक १३, १४ तसेच १९ व २० रिकाम्या करण्यात आल्या असून येथील मनोरुग्णांची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक इमारतींच्या छताचा भाग वेळोवेळी कोसळत असून या सर्व इमारतींच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपये लागतील असा प्रस्तावही रुग्णालय प्रशासनाने पाठवला आहे. तथापि आजपर्यंत आरोग्य विभागाला सरकारने फुटकी कवडीही सरकारकडून देण्यात आलेली नाही. ७७ एकरवर असलेल्या या रुग्णालयातील ८.४२ एकरवर अतिक्रमण झाले आहे. परिणामी मनोरुग्णालयाच्या ताब्यात ६६.६७ एकर जागा असून यात निवासी व मनोरुग्णालयासह एकूण ७३ इमारती आहेत. या मनोरुग्णालयातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात येथे चालणेही कठीण होऊन जाते.

मनोरुग्णालयाकडे दुर्लक्ष, यात कुणाचा फायदा?

गेली सहा वर्षे ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आतातरी या मनोरुग्णालयाच्या दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष देऊन जिल्हा विकास योजनेतून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी अपेक्षा येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. दुर्देवाने मनोरुग्णालयाला वाऱ्यावर सोडून विस्तारीत रेल्वे स्थानकाच्या नावाखाली रुग्णालयाची तब्बल १४ एकर जागा ताब्यात घेण्याचे उद्योग केले जात आहेत. यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वेसाठी जागा मिळावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे. खरेतर हे काही बिल्डरांच्या चांगभल्यासाठी करण्यात येत असून हा काहीशे कोटी रुपयांचा ‘उद्योग’ असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जवळपास एक हजार मनोरुग्ण व मनोरुग्णालयाला गेली अनेक वर्षे वाऱ्यावर सोडणारे रेल्वे फलाटाच्या नावाखाली मनोरुग्णालयाची मोक्याची जागा ‘ताब्यात’ घेण्यासाठी का तळमळत आहेत? असा सवालही येथील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:17 pm

Web Title: thane district mental hospital patients found corona positive pmw 88
Next Stories
1 वसईत थरार! सोसायटीचा सुरक्षारक्षक बनला सुपरमॅन, घरात आग लागलेल्या गॅस सिलेंडरला हाताने उचलून गटारात टाकले
2 ठाणे कारागृहातील कैद्यांनाही लस
3 जिल्ह्याला दोन लाखांहून अधिक लशींचा पुरवठा
Just Now!
X