आध्यात्मिक बैठका गाठून उमेदवारांचा प्रचार

निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आता या अस्त्रांमध्ये अध्यात्माचीही भर घातली आहे. यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ११ जागांमुळे महत्त्वाच्या ठरलेल्या दिवा परिसरावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अशातच आता दिवा भागात निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठय़ा संख्येने वास्तव्यास असल्याची बाब लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागण्यास सुरुवात केली आहे. दिव्यातील निवडणूक प्रचारात अप्पासाहेबांच्या नावाचा वापर शिवसेना करत असल्याचा आरोप मनसेचे नेते उघडपणे करीत आहेत, तर शिवसेना नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत विकासाच्या जोरावर मत मागत असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून अखेरच्या टप्प्यात असलेल्या प्रचारात जाहीर सभा, रोड शो आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातून ११ नगरसेवक निवडून येणार असल्याने या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाश्र्वभूमीवर दिवा परिसराकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याने यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसर निवडणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिवा परिसरातूनच निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनी दिव्यात जाहीर सभा घेतल्या. दिव्यातील कचराभूमीमुळे नागरी आरोग्यावर होणारा परिणाम तसेच रस्ते, पाणी अशा मूलभूत समस्यांच्या मुद्दय़ावरून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. असे असतानाच निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर प्रचारात होऊ लागल्याची चर्चा आहे. दिवा परिसरात धर्माधिकारी यांच्या अनुयायांची संख्या मोठी असून त्यांच्या ‘बैठक’ही या ठिकाणी होतात. नेमकी हीच बाब हेरून राजकीय पक्षांनी मतांच्या जोगव्यासाठी त्यांच्या नावाचा वापर सुरू केला आहे. दिव्यामध्ये बुधवारी झालेल्या मनसेच्या जाहीर सभेत बोलताना मनसेचे जिल्हा संपर्क नेते अभिजीत पानसे यांनी ही बाब उघड करत शिवसेनेवर आरोप केले. या आरोपांमुळे आता शिवसेना आणि मनसेमध्ये या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ज्येष्ठ समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे आणि त्यांच्या बद्दल आमच्या मनात वेगळे स्थान आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात आम्ही कधीही त्यांच्या नावाचा वापर करीत नाही. आम्ही केवळ विकासाच्या जोरावर मते मागत आहोत.

नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

दिवा परिसरात ज्येष्ठ समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठय़ा संख्येने असल्यामुळे मतांसाठी शिवसेनेने त्यांच्या नावाचा वापर सुरू केला आहे. या पाश्र्वभूमीवर अप्पासाहेबांची भेट घेतली असता, त्यांनी मात्र आपला राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

अभिजीत पानसे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख, मनसे