ठाण्यातील अभिनय कट्टय़ावरील हौशी कलावंतांचा ‘सिंड्रेला’ चित्रपट
ठाण्यातील एका कट्टय़ावर जमणाऱ्या तरुणांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने हौशी नाटय़ चळवळीची सुरुवात केली. रविवारी सायंकाळी एकत्र जमायचे आणि एकांकिका, पथनाटय़, नाटुकली, एकपात्री अशाच कलाकृतींचे सादरीकरण करायचे असा या तरुणांचे नित्यक्रम असायचा. या रविवारच्या सादरीकरणातून या तरुणांना प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्यांनी चक्क एक चित्रपट साकार केला. नाटय़ चळवळीला वाहिलेल्या संस्थेने अशा प्रकारे चित्रपट निर्मितीचे शिवधनुष्य पेलल्याचा ठाण्यातील हा पहिलाच प्रयोग असून ‘सिंड्रेला’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचे दर्शन घडणार आहे. लहान मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या ‘सिंड्रेला’ या चित्रपटात सगळे कलाकार ठाणेकर असून ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
ठाण्यातील नौपाडा येथील जिजाऊ उद्यान हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली २७ फेब्रुवारी २०११ रोजी अभिनय कट्टय़ाची स्थापना झाली. गेल्या चार वर्षांपासून या कट्टय़ावर २३९ मैफिली झाल्या. कट्टय़ावर येणाऱ्या प्रत्येकाला अभिनयाची संधी देण्याबरोबर ५२ आठवडय़ांत नवनव्या ५२ भूमिका साकारण्याची अनोखी संधी या माध्यमातून येथील कलाकारांना देण्यात मिळाली. एकांकिका, पथनाटय़, नाटुकल्या, एकपात्री, साहित्यिक अभ्यास अशा माध्यमातून कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या जोरावर कट्टय़ावरील अनेक चेहरे मराठी मालिका, नाटकांमध्ये झळकले. यातूनच प्रेरणा घेत किरण नाकती यांनी चित्रपटनिर्मितीचा निर्णय घेतला आणि कट्टय़ावरील मंडळींना घेऊन ‘सिंड्रेला’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. कट्टय़ावरच्या कलाकारांना हे वेगळे माध्यमाची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या अभिनयाचे दर्शन घडवण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना मिळाली असल्याचे किरण नाकती यांनी सांगितले. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यातील मुख्य कलाकारांची ओळख होऊ शकणार आहे. तर ४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार असल्याचे अभिनय कट्टय़ाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कथा ‘सिंड्रेला’ची..
परिकथेतील सिंड्रेला सगळ्यांनाच माहिती असून गरिबीतून मोठी होऊन राणी होण्याचे तिचे स्वप्न सगळ्यांनाच माहिती आहे. सिंड्रेला या चित्रपटामध्येही अशाच गरीब कुटुंबातील भावंडांची कथा चितारण्यात आली आहे. बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा भाऊ कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कामे न करता यशस्वी कसा होतो हे या चित्रपटातून पाहता येऊ शकणार आहे.