पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या यंदाच्या ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल ३५ हजार धावपटू सहभागी होणार असून प्रथमच वेळ मोजणी तंत्रज्ञानाचा (टाइम टेक्नॉलॉजी) वापर केला जाणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे आयोजित स्पर्धेसाठी ‘निर्धाराने धावू या, ठाणे स्वच्छ व हिरवेगार करूया’ हे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. यंदा प्रायोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी आता वर्षां मॅरेथॉनचा खर्च महापालिकाच उचलणार आहे.यंदाची मॅरेथॉन स्पर्धा येत्या २३ ऑगस्टला होणार आहे. सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेमुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून यंदा ही स्पर्धा दरवर्षीपेक्षा दोन तास आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा २६ वे वर्ष आहे.  स्पर्धा विविध नऊ  गटांत होणार असून त्यासाठी एकूण पाच लाखांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी एकूण २०० पंच, ८० पायलट, २१० सुरक्षारक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आदींची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, रुग्णवाहिका, महापालिका भवन येथे प्राथमिक औषधोपचार केंद्र आणि या स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे असतील. याशिवाय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी ठाणे परिवहन सेवेतर्फे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्येष्ठांसाठी वेगळा गट..
६० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी गेल्या वर्षीपासून स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक गट ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा महापालिका भवन ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अर्धा किलोमिटर अंतराची आहे.या मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच कालमापन तंत्राचा वापर करण्यात येणार असून २१ किलोमिटर पुरुष गट आणि १५ किलोमिटर महिला गट या दोन मुख्य स्पर्धेतील धावपटूंना ‘टाइम चीप’ देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू भाग घेणार असल्याचा दावा महापौर संजय मोरे यांनी केला आहे.