10 July 2020

News Flash

अर्थसंकल्प रखडला!

ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटका

ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटका

ठाणे : शहराच्या विकासाचा निश्चित अशी दिशा ज्या माध्यमातून आखली जाते असा ठाणे महापालिकेचा बहुचर्चित अर्थसंकल्प महापालिका प्रशासनातील अंतर्गत वादामुळे लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यंदाचा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होण्यासाठी वेळीच कार्यवाही करावी, असे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी यापूर्वीच आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहे. असे फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडा उजाडला तरी अर्थसंकल्प सादर होत नसल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रशासनातील अंतर्गत वादामुळेच अर्थसंकल्प लांबणीवर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असून यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मार्च महिनाअखेर मंजूर होण्याची शक्यता धूसर दिसू लागली आहे. त्याचा फटका शहरातील विकासकामांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. त्यामध्ये स्थायी समितीकडून काही बदल करून तो सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जातो. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक चर्चा करून उत्पन्नवाढीसाठी काही उपाययोजना  सुचवितात. या सर्वाचा समावेश करून अखेर अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी दिली जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊ न त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम नागरी विकासकामांना होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना महिनाभरापूर्वी पत्रही दिले होते. मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्यापही प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला नसून त्यामुळे यंदाही अर्थसंकल्प मार्च महिनाअखेर मंजूर होण्याची शक्यता धूसर आहे.

प्रशासनातील धुसफुस

ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या आठवडय़ात करण्यात आल्या होत्या. यामध्ये काही अधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडी सूचनेनंतर बदल्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. यातूनच महापालिका प्रशासनातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला असून त्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या संदेशाची भर पडली आहे. या वादामुळेच अर्थसंकल्प लांबणीवर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर व्हावा यासाठी लवकर सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला यापूर्वीच केल्या होत्या. मात्र अद्यापही अर्थसंकल्प सादर केला नसल्यामुळे प्रशासनाला लेखी पत्र पाठवून लवकर अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

– राम रेपाळे, स्थायी समिती सभापती, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 4:32 am

Web Title: thane municipal corporation budget delayed due to internal dispute zws 70
Next Stories
1 कर थकवणाऱ्या विकासकांच्या मालमत्तांना टाळे
2 ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चा सायबर सेलकडून माग
3 भाईंदर खाडीपूल चार वर्षांत पूर्ण
Just Now!
X