उत्पन्न वाढले तरी खर्चामुळे पुरेसा निधी शिल्लक नाही; ठाणे पालिकेच्या तिजोरीत केवळ ७६ कोटी रुपये शिल्लक

ठाणे : जून महिन्याच्या अखेरीस मालमत्ता कर, पाणी देयक तसेच विविध करांच्या माध्यमातून ३०४ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असले तरी करोना उपाययोजनांवर होणारा खर्च, ठेकेदारांच्या बिलाचा परतावा आणि वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून उभे राहिलेले दायित्व यांमुळे जेमतेम ७६ कोटी रुपयांची शिल्लक राहिल्याने महापालिकेचा आर्थिक गाडा रुतल्याचे पुन्हा स्षष्ट झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्यावर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला. करोनाचा संसर्ग रोखण्याच्या कामात संपूर्ण पालिका यंत्रणा व्यग्र होती. जुलै महिनाअखेपर्यंत मालमत्ता कर, पाणी देयक तसेच विविध करांची वसुली सुरू झाली होती. यंदाही मार्च महिन्यात करोनाची दुसरी लाट शहरात आली. यावेळेस करोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच विविध करांच्या वसुलीकडे पालिका प्रशासनाने विशेष लक्ष दिले. यामुळे जून महिनाअखेपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३०४ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. त्यात मालमत्ता करातून २०४ कोटी २० लाख, पाणीपुरवठा देयकातून १० कोटी ९८ लाख, शहर विकास विभागाच्या शुल्कातून ५८ कोटी ६५ लाख, अग्निशमन दलाच्या शुल्कातून १३ कोटी ८० लाख आणि इतर विभागांच्या करातून १६ कोटी ६४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न वसुलीत चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु विविध विभागांतील अत्यावश्यक कामांवर पालिकेचा निधी खर्च होत आहे. या कामांसाठी ४० कोटी रुपये खर्च झाला आहे. याशिवाय करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आणि रुग्ण उपचारांसाठी पालिकेचा निधी खर्च होत आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत जेमतेम ७६ कोटी रुपयेच शिल्लक असून पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगाराशिवाय ही रक्कम आहे. राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा कराचे अनुदान वेळेवर येत असून त्यातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार भागविले जात असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

..तर आर्थिक दिलासा मिळेल

राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मुद्रांक शुल्काची रक्कम मिळते. २०१९ पासून महापालिकेला ही रक्कम मिळालेली नाही. सुमारे शंभर कोटी रुपये ही रक्कम आहे. तसेच ठाणे महापालिका प्रशासनाने एमएमआरडीए, सिडको आणि शासनाच्या माध्यमातून शहरात करोना रुग्णालये उभारली असून त्यासाठी १८५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यापैकी एमएमआरडीए, सिडको आणि शासनाकडून आतापर्यंत ५५ कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळाला असून उर्वरित शंभर कोटी रुपयाचा निधी येणे आहे. हा निधी मिळाला तर महापालिकेला काहीसा दिलासा मिळेल.

ठेकेदार देयकांच्या प्रतीक्षेतच

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि मलनि:सारण या विभागांमध्ये केलेल्या कामाची देयके गेल्या दोन वर्षांपासून मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयासमोर भरपावसात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर लेखापरीक्षण विभागाने सर्व विभागांकडून ठेकेदारांच्या देयकांची माहिती मागविली होती. या माहितीनुसार ठेकेदारांची ८६१ कोटी रुपयांची देयके देणे बाकी असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. सद्य:स्थितीत पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे हे सर्वच ठेकेदार देयकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.