ठाणे महानगरपालिकेची अभिनव संकल्पना

ठाणे शहरात फिरताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास व्यक्तीचा प्राण वाचविण्यास मदत करणारी ‘डिफिब्रिलेटर’ यंत्रणा शहराच्या विविध भागांत बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे आणि क्रिटिकल मेडिकलचे अनिल छुगांनी यांनी शुक्रवारी या संदर्भातील आरोग्ययंत्राची प्रात्यक्षिके महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर सादर केली आहेत. त्यानुसार आरोग्य केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्थानक या ठिकाणी ही आरोग्ययंत्रे ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना, खरेदी करताना अचानक एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास या डिफिब्रिलेटर यंत्राद्वारे छातीच्या विशिष्ट भागात दोन स्टिकर्स लावून यंत्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समप्रमाणात विद्युत उपचारपद्धती (शॉक ट्रिटमेंट) दिली जाते. या उपचारपद्धतीमुळे दोन ते तीन मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळवून त्या व्यक्तीचा प्राण वाचण्यास मदत होते. विशेष म्हणजे प्रशिक्षण दिलेली व्यक्ती हे यंत्र योग्यरीत्या हाताळू शकते. त्यामुळे या आरोग्ययंत्रामुळे हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.