एलईडी पथदिवे बसविण्याची महापालिकेची योजना

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गाची दुरुस्ती करून तो महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असतानाच आता या मार्गावर रात्री पडणारा अंधार दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. मार्गावर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी १२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या मार्गावरील अपघात टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन चालकांची लूटमार होण्याच्या प्रकारांनाही आळा बसेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. या वाहनांचा आकडा सुमारे १५ हजारांच्या आसपास आहे. कार, दुचाकी तसेच अन्य वाहनांचीही वाहतूक या मार्गावरून सुरू असते. काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. येथील वाहतूक ठाणे, नवी मुंबई, कल्याण शहरांतून वळविण्यात आल्यामुळे या शहरांमध्ये कोंडी होऊ लागली होती. महिनाभरापूर्वी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण शहरांची कोंडीतून काही प्रमाणात सुटका झाली, मात्र या मार्गावर अद्याप पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.

ठाणे शहरातून अवजड वाहतुकीला सकाळी आणि संध्याकाळी बंदी असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक दुपारी आणि रात्री सुरू असते. मात्र, रात्री मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर अंधार असतो. डोंगराळ भागातील वळण रस्त्यावर अंधार असल्यामुळे चालकाचा अंदाज चुकून अपघात होतात. गेल्या काही दिवसांत वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता या मार्गावर एलईडी पथदिवे बसविण्याची योजना आखली असून त्यासाठी दोन कोटी १२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

१२ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर अटलांटा पूल ते वाय जंक्शनपर्यंत ५.८ किमी लांबीचा रस्ता आहे. या रस्त्यावर सात मीटर उंचीचे १२० व्ॉटचे एलईडी पथदिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांना वीजपुरवठा करण्यासाठी मार्गावर पाच ठिकाणी कंट्रोल पॅनल बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन कोटी १२ लाख ४८ हजार ७९९ रुपयांच्या अंदाजखर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.