News Flash

हसनैन वरेकर मनोरुग्ण?

हसनैनने हे हत्याकांड का केले याबाबत बहिणीच्या जबाबातून कोणतीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही.

‘स्किझोफ्रेनिया’ची औषधे सापडल्याने पोलिसांचा आता नवा तपासविशेष

कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या करून आत्महत्या करणाऱ्या हसनैन वरेकर याच्या शय्यागृहात पोलिसांना स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या आजारावरील दोन औषधे सापडली आहेत. त्यामुळे हसनैन मनोरुग्ण होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरांतील मानसोपचारतज्ज्ञांशी संबंधित संघटनांशी पोलिसांनी संपर्क सुरू केला असून तो उपचार घेत होता का, अशी विचारणा पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, हसनैनने हे हत्याकांड का केले याबाबत बहिणीच्या जबाबातून  कोणतीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही.

ठाणे पोलिसांनी हसनैनच्या घरातून अन्न, औषध तसेच शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. शीतपेय तसेच अन्नात कोणत्याही प्रकारचे गुंगीचे औषध अथवा विष होते का यासंबंधीची विचारणा पोलिसांनी  तज्ज्ञांकडे केली आहे. मात्र  यासंबंधीचा अहवाल गुरुवापर्यंत पोलिसांना प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी पत्रकारांना दिली. तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत विविध अंगाने पोलीस तपास करत असले तरी कोणत्याही कारणाची ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही, असे समजते. हसनैन कर्जबाजारी होता किंवा त्याने सुपारीचा व्यापार सुरू करण्यासाठी बहिणीकडून काही रक्कम उधार घेतली होती, अशी कारणे यापूर्वी स्पष्ट झाली आहेत. तरी हे हत्याकांड याच कारणांमुळे झाले आहे का, याविषयी अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान, कर्मकांड, बुवाबाजी, जन्नत मिळविण्यासाठी केलेले कृत्य अशा अनेक अफवा पसरत असल्या तरी त्याबाबतची कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मानसिक आजारासंबंधीच्या  गोळ्यांसोबत हसनैनच्या शयनगृहातून शरीरवर्धक गोळ्याही पोलिसांना सापडल्या आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. मुलीस जन्म दिल्यानंतर त्याची पत्नी तीन महिन्यांनी हत्याकांडाच्या आदल्याच दिवशी घरी आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 3:51 am

Web Title: thane murder case
टॅग : Thane
Next Stories
1 कल्याणात ‘झेब्रा क्रॉसिंग’ अवतरले!
2 होळीआधीच फुगाफेकीची धुळवड!
3 ‘सुरां मी वंदिले’
Just Now!
X