उपवन, घोडबंदर परिसरात व्यायाम, ध्यानधारणेसाठी गर्दी; बंदिस्त व्यायामशाळांपेक्षाही खुल्या हवेतील योगसाधनेला पसंती

ठाणे : बदलत्या जीवनशैलीमुळे येणाऱ्या आजारांवर उपाय म्हणून कृत्रिम औषधे वा ‘ठोकळेबाज’ आहार घेण्याऐवजी ठाणेकरांनी निसर्गाच्या सहवासाला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच ठाण्यातील उपवन तसेच घोडबंदर या परिसरातील नागरी संकुलांतील ऐसपैस जागा तसेच रस्त्यालगतचा विस्तीर्ण भाग येथे दररोज आरोग्य संस्कार मेळे, मॅरेथॉन सराव, योगसाधना, ध्यानधारणा, घोडेस्वारी असे विविध उपक्रम भरू लागले आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमांना केवळ ठाणेकरच नव्हे तर आसपासच्या शहरांतील नागरिकही हजेरी लावत आहेत.

मद्यपींचा घोळका, प्रेमी युगुलांचे गैरवर्तन, दुचाकीस्वारांच्या वेगवान कसरती यामुळे येऊर, उपवनच्या निसर्गसौंदर्याला उतरती कळा लागली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून उपवन, येऊर परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात योगा, व्यायामाचे प्रशिक्षण घेण्याचा कल नागरिकांमध्ये वाढू लागला आहे. चारही बाजूला असलेला डोंगर, तलावाच्या काठावर असणारी मोकळी जागा विविध फिटनेस केंद्रांना खास आकर्षित करत आहे. या फिटनेस केंद्रांच्या प्रशिक्षकांसाठी उपवन, येऊर परिसर नागरिकांना योगा, व्यायाम प्रशिक्षण देण्यासाठी खुणावत आहे. उपवनबरोबरच घोडबंदर, मानपाडा येथील गृहसंकुल परिसरातील मोकळ्या रस्त्यावर, तलावाच्या काठी, येऊरच्या टेकडीवर सकाळच्या वेळी आपापल्या समूहाची ओळख दर्शवणारे टीशर्ट परिधान करून हे प्रशिक्षक नागरिकांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत. मॅट सत्रातील योगा, पॉवर योगा, व्यायाम, झुंबा असे प्रशिक्षण उपवन तलाव परिसरात प्रशिक्षकांच्या माध्यमातून दिले जात असून पहाटे पाच वाजताच हा परिसर गजबजलेला असतो. उपवन तलावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊर टेकडीवर धावण्याचा सराव केला जात असल्याने दाट झाडीच्या सान्निध्यात धावण्यासाठी आठवडय़ातून एक दिवस नागरिकांची गर्दी होत असते, असे प्रशिक्षक बाबू जाधव यांनी सांगितले. याच ठिकाणी असलेल्या मैदानात घोडेस्वारी, बॉक्सिंग प्रशिक्षण होत असून लहान मुलांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  निसर्गात ध्यानधारणा करण्याची संकल्पना शहरात रुजू लागल्याने उपवन, येऊर परिसर यासाठी सोईस्कर वाटतात, असे या ठिकाणी योगा शिकणाऱ्या तृप्ती राऊत यांनी सांगितले.

कोणताही शारीरिक व्यायाम, योगा करायचा असल्यास मोकळ्या जागी, पर्यावरणाच्या सान्निध्यात केल्यास उत्तम ठरतो. ठाणे शहरात येऊर, उपवनसारखी ठिकाणे यासाठी उपयुक्त ठरतात. व्यायाम सत्र आयोजित करतानाच लांब पल्ल्यावरील धावण्याचा सराव करायचा असतो. अशा वेळी येऊरची टेकडी सोईस्कर ठरते. 

 हरिदासन नायर, मुख्य प्रशिक्षक, ‘रनटॅस्टिक्स दिलसे ग्रुप’