सुहास बिऱ्हाडे @suhas_news

suhas.birhade@expressindia.com

मोबाइलमध्ये १० आकडे असतात. एक जरी आकडा कमी असेल किंवा चुकीचा असेल तर योग्य नंबर लागत नाही. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसमोर मात्र एक अशक्य वाटणारे आव्हान होते. एका महिलेच्या हत्या प्रकरणात ६ आकडय़ांच्या आधारे एक मोबाइल क्रमांक शोधायचा होता. हे आव्हान अत्यंत कठीण होते. पंरतु पोलिसांनी जिद्दीने तपास करत एक थरारक हत्येचे प्रकरण उघडकीस आणले..

मुंबई अहमदाबाद महामार्ग हा तसा निर्जन. १६ जानेवारीला या महामार्गाजवळ वर्सोवा नाक्यापासून आत जाणाऱ्या जंगलात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. अज्ञात इसमाने अत्यंत पद्धतशीरपणे या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकला होता. तिच्या केवळ हाडांचा सांगाडा उरला होता. तिची ओळख पटणे शक्यच नव्हते. काशिमीरा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हा महामार्ग पालघर जिल्ह्य़ातून जातो. या ठिकाणी यापूर्वीही अनेक मृतदेह टाकण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्याने या महिलेची हत्या केली, त्याने या परिसराचा अभ्यास केला असावा असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र महिलेची ओळख पटणे गरजेचे होते. परंतु या महिलेचे कपडे पूर्ण जळालेले होते. त्यामुळे काही माग लागत नव्हता. पोलिसांनी कुण्या बेपत्ता महिलेची नोंद मुंबई आणि पालघरमधील पोलीस ठाण्यात आहे का, ते तपासले, पण अशी काहीच नोंद नव्हती. त्यामुळे हे प्रकरण बंद करावं लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, साहाय्यकपोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर आदींचे पथक कामाला लागले. त्यांनी घटनास्थळाचा बारकाईने शोध घेतला. कुठे काही पुरावा मिळेल का याची आशा होती. आसपास प्लास्टिकचा कचरा, रिकामे डबे असे फुटकळ साहित्य होते. तिथेच पोलिसांना कागदाचा एक तुकडा मिळाला. तो फाटलेला होता. त्या तुकडय़ावर एक मोबाइल क्रमांक होता. परंतु अर्धा कागद फाटल्याने केवळ सहाच आकडे होते. उर्वरित ४ आकडे गायब होते. हत्या झालेल्या महिलेपर्यंत हे सहा आकडे पोहोचवू शकतील, अशी आशा पोलिसांना वाटली. अर्थात हे काम अशक्यप्राय होते. पूर्ण मोबाइल क्रमांक असता तर काही तरी करू शकले असते. परंतु सहा आकडय़ांवरून कसा शोध घेणार ? मात्र जिथे सर्व शक्यता संपतात आणि जिथे अशक्य वाटते तिथे खऱ्या अर्थाने पोलिसांचा कस लागतो. पोलिसांनीही मग या सहा आकडय़ांवरून गुन्ह्य़ाचा माग काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन केली. ६ आकडय़ापुढील क्रमांकअंदाजाने काही आकडे टाकून त्या क्रमांकावर फोन करण्यास सुरुवात केली. पण काहीच यश येत नव्हते. परंतु पोलिसांनी न हारता जिद्दीने काम सुरू ठेवले. अखेर एक क्रमांक जुळला. नालासोपारा येथील एका महिलेचा हा मोबाइल क्रमांक होता. पोलिसांनी तिला विचारले की, ४५ वर्षांची कुठली महिला बेपत्ता झाली आहे का? कारण मृतदेह जळाल्याने छायाचित्र दाखवूनही उपयोग नव्हता. या महिलेने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. नालासोपारा पूर्व विभागात श्रीरामनगर येथे राहणारी निर्मला यादव ही महिला लग्नासाठी पुण्याला जाते असे सांगून गेली होती. परंतु ती अजून काही आली नाही आणि तिचा फोनही लागत नाही, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. जळालेल्या महिलेचा मृतदेह आणि निर्मला यादव एकच आहेत का याचाही पोलिसांना तपास करायचा होता. पोलिसांनी निर्मला यादवच्या पतीला आणले. तिच्या पतीने मृतदेहाच्या पायाच्या पैजणांवरून हा मृतदेह पत्नी निर्मला यादवचाच असल्याचे ओळखले. पोलिसांचे काम झाले होते. महिलेची ओळख पटली होती. आता पुढील आव्हान होते, मारेकरी शोधण्याचे.

निर्मला यादव ही महिला किराणा मालाचे दुकान चालवायची. तिचा पती व्यसनी होता. त्यांना दोन मुले होते. पोलिसांनी निर्मला यादवच्या मोबाइलचा तपशील (सीडीआर) काढला. अबरार मोहम्मद शेख (२५) हा तरुण सातत्याने निर्मलाशी फोनवर संपर्कात असल्याचे समजले. तो नालासोपारा परिसरात राहात होता. निर्मलादेवीच्या

हत्येनंतर तो फरार झाला होता. पोलिसांचा संशय बळावला. अबरार आणि निर्मला देवी यांचे अनैतिक संबध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो मूळचा कर्नाटकचा होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथके कर्नाटकला पाठवली. गुलबर्गा येथे लपून बसलेल्या अबरारला पोलिसांनी अटक केली.

अबरार हा विवाहित होता आणि त्याचे गेल्या दीड वर्षांपासून निर्मला यादव बरोबर अनैतिक संबंध होते. निर्मलाने अबरारकडे लग्नाचा तगादा लावल्याने अबरार कंटाळला होता. त्यामुळे या प्रकरणातून पिच्छा सोडविण्यासाठी त्याने हत्येची योजना आखली. याबाबत माहिती देताना साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, निर्मला यादव पुण्याला लग्नाला निघाली होती. ती ठाण्यापर्यंत पोहोचली होती. अबरारने तिला भेटण्यासाठी घोडबंदरला बोलावले. ती आल्यावर रिक्षातून तिला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील त्या निर्जन जागेवर नेले. तिथे तिच्याशी संबंध ठेवले आणि ती बेसावध असताना तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. सोबत आणलेल्या कॅनमधून रॉकेल टाकून तिला पेटवून टाकले आणि सर्व पुरावे नष्ट केले. निर्मला यादव हिचे सर्व कपडे, सामान जळाल्याने काहीच पुरावा शिल्लक नव्हता. परंतु पुण्याला जाण्यापूर्वी तिने आपल्या शेजारीण महिलेचा मोबाइल क्रमांक एका कागदावर लिहून ठेवला होता. पंरतु तो कागद झटापटीत फाटला आणि लांब झुडपात जाऊन पडला. याच कागदावरील अर्धवट मोबाइलच्या सहा आकडय़ांवरून पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आणि आरोपीला गजाआड केले.