भायंदरपाडा येथे विलगीकरण कक्ष; घरपोच धान्य पुरवठय़ाचा विचार

ठाणे : करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन करूनही भाजीमंडई, किराणामाल आणि औषध दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने बुधवारी जांभळीनाक्यासह शहराच्या विविध भागात विक्रेते आणि ग्राहकांमध्ये दहा फुटाचे तर ग्राहकांमध्ये ठराविक अंतर आखून दिले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

भायंदरपाडा येथे पालिकेने नवीन विलगीकरण कक्ष सुरू केला असून त्याचबरोबर बिग बझार, डी मार्टच्या माध्यमातून सोसायटय़ांना धान्य पुरवठा करण्याचा विचारही पालिकेने सुरू केला आहे. याशिवाय, शहराच्या १२ प्रवेशद्वारांवर येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्याच्या सूचनाही आयुक्त सिंघल यांनी दिल्या आहेत.

संचारबंदीत किराणा माल, दुध, भाजीपाला, औषध आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू आहेत. नागरिकांकडून अशा दुकानांवर खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. ठाण्यातील जांभळी नाक्यावरील भाजी मंडईमध्ये मंगळवारीही अशाचप्रकारे गर्दी केली होती.

अशीच काहीशी अवस्था शहराच्या अंतर्गत भाजीपाला, किराणामाल आणि दुध दुकानांवर होती. त्यामुळे शहरात खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये दहा फुटाचे तर ग्राहकांमध्ये ठराविक अंतर आखून देण्याचे आदेश दिले होते.  या आदेशाची अंमलबजावणी प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केली आहे. त्यामध्ये जांभळीनाक्यासह शहराच्या विविध भागांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी अद्यापही ठराविक अंतर आखून देण्याचे काम सुरू आहे.

या सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. त्यामध्ये महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, आरोग्य केंद्र, गर्दीची ठिकाणे, भाजी मंडई असे परिसर सोडियम हायपोक्लाराईटसने र्निजतुकीकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच पदपथ आणि त्यालगतचे रस्तेही र्निजतुकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

भायंदरपाडा येथे विलगीकरण कक्ष

करोना विषाणुचा सामना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे ८ खाटांचा विलगीकरण कक्ष करण्यात आला असून कल्याणफाटा येथील टाटा हाऊसिंगच्या रेंटल इमारतीमध्येही विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील भायंदरपाडा येथील लोढा कॉम्प्लोक्समध्ये भाडे तत्वावरील योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या सी विंगमधील ७८० सदनिका उपलब्ध करून देण्याचे एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी मान्य केले आहे. त्यामुळे भायंदरपाडा येथे नवीन विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सिंघल यांनी दिल्या आहेत.

सोसायटय़ांपर्यंत धान्य

जीवनाश्यक वस्तूंच्या बाबतीत नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. याबाबत बिग बझार, डी मार्ट यांच्याशी चर्चा करून सोसायटय़ांपर्यंत धान्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे, असेही सहाय्यक आयुक्तांना स्पष्ट केले आहे. तसेच करोनाबाबत तातडीच्या मदतीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.