ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि कल्याण, डोंबिवली शिवसेना यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘ठाणे श्री २०१६’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब अक्षय मोगरकर याने पटकाविला. त्यासोबतच अक्षयची ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठीदेखील निवड झाली आहे. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात झालेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून तब्बल ११७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून अक्षय मोगरकर याने पहिला क्रमांक पटकावला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याला स्मृतिचिन्ह व ५१ हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच ५५ किलो वजनी गटात संदीप पाटील, ६० किलो वजनी गटात स्वप्निल पाटील, ६५ किलो वजनी गटात अनिश पांडे, ७० किलो वजनी गटात राजेंद्र रावल, ७५ किलो वजनी गटात रितेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ‘बेस्ट पोझर’चा किताब जितेंद्र ढोणे याला मिळाला. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंची महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याचे ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

साहसी कायाकिंग प्रशिक्षण स्पर्धा उत्साहात

कल्याण येथे झालेल्या साहसी कायाकिंग प्रशिक्षण स्पर्धेत मुलांच्या गटात भिवंडीच्या भावेश भामरे याने तर मुलींच्या गटात रेश्मा सिद्धी हिने प्रथम क्रमांक पटाकाविला. भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, ठाणे आणि प्राथमिक महाराष्ट्र युवा संघ कल्याण व ठाणे जिल्हा साहसी कायाकिंग व कनोईंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने ६ मार्च रोजी जिल्हास्तरीय युवा साहसी कायाकिंग प्रशिक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिसाई फार्म चौरेगाव दहागाव नदी येथे ही स्पर्धा पार पडली. कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड, आदी भागातून एकूण ७५ युवक-युवतींनी या प्रशिक्षण स्पर्धेत भाग घेतला होता. कायाकिंग बोट व राफ्टिंग स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात भिवंडीच्या भावेश भामरे याने प्रथम, बदलापूरच्या आझाद धिवर याने द्वितीय तर विवेक पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर मुलींच्या गटात भिवंडीच्या रेश्मा सिद्धी हिने प्रथम, टिटवाळ्याच्या नंदिनी मनकट्टी तसेच ठाण्याच्या प्रियंका मालकर हिने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष गणपत गायकवाड, उपाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी युवक-युवतींना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व युवक-युवतींना नेहरू युवा केंद्र ठाणेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुंबई पोलीस संघाची ‘हॅट्ट्रिक’ 

अ‍ॅचिव्हर्स फाऊंडेशन आणि सुरेखा एंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ‍ॅचिव्हर्स हॉलीबॉल कप-२०१६ या स्पर्धेत मुंबई पोलीस संघाने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा बाजी मारत अ‍ॅचिव्हर्स कपवर आपले नाव कोरले आहे. तर मुलींच्या गटात एस सेटर्स या संघाने बाजी मारली.

ठाणे येथील जांभळी नाका भागातील शिवाजी मैदानात २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुंबई पोलीस संघाच्या सिद्धांत पाठक याला गौरविण्यात आले, तर मुलींच्या गटात एस सेटर्सची कर्णधार दीपिका हिला सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या गटात २८ संघ तर मुलींच्या गटात १० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुंबई पोलीस विरुद्ध आरसीएफ या दोन संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगला होता. यात मुंबई पोलीस संघाने आरसीएफ संघाचा पराभव करत तिसऱ्यांदा जेतेपद पटकाविले.

राज्यस्तरीय स्पर्धेत ‘एसएसटी’ महाविद्यालय उपविजेते

कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात मुंबई पोलीस संघाने उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करत जेतेपद पटकाविले. यामुळे पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालेल्या एसएसटी महाविद्यालयाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तसेच सीएचएम महाविद्यालय आणि रायगड संघाला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कर्जत येथील अखंड क्लबच्यावतीने २७ व २८ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालय संघाकडून धनश्री हरमलकर, दक्षता राऊत, जयश्री वानखेडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पुरुष गटात उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालय संघानेही चौथा क्रमांक पटकविला. या संघात आनंद खंडागळे, गोविंद सोनार, शीतेन यादव या खेळाडूंनी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. प्राचार्य व क्रीडा शिक्षक राहुल अकुल, मार्गदर्शक दीपक खरात यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

स्व. यशवंतराव ओंबासे चषक स्पर्धेत रॉक स्केटर्स क्लबची बाजी

कल्याण येथे नुकत्याच पार पडलेल्या स्वर्गीय यशवंतराव ओंबासे स्मृतिचषक स्पर्धेत खारघरच्या रॉक स्केटर्स क्लबने १६ सुवर्णपदके मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकविले, तर डोंबिवलीच्या गरुडा क्लबने ११ सुवर्णपदके मिळविल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नेरुळच्या स्पीट ट्रॅक क्लबने आठ सुवर्णपदके मिळवत तृतीय स्थान पटकाविले.

स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका व ठाणे जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६ मार्च रोजी कल्याण येथील सेक्रेट हार्ट स्कूल येथे स्वर्गीय यशवंतराव ओंबासे स्मृतिचषक या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातून ५६० खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा स्केटिंगच्या चार विविध प्रकारात खेळविण्यात आली. राज्य स्केटिंगचे अध्यक्ष पी. के. सिंग, राज्य स्केटिंगचे उपाध्यक्ष गणेश राव, कल्याण स्केटिंगचे अध्यक्ष अशोक करपे, तायक्वांदो राज्य सचिव व कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप ओंबासे आणि नागरिक आदींच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.