वादग्रस्त प्रस्तावास हिरवा कंदील

ठाणे महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेली क्रीडा संकुले कोणत्याही निविदेशिवाय मर्जीतल्या ठेकेदारांना बहाल करण्याच्या प्रशासनाच्या वादग्रस्त प्रस्तावावर शनिवारी सत्ताधारी शिवसेनेसह पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरीची मोहोर उमटवली. घोडबंदर भागातील ढोकाळी येथील शरदचंद्र पवार क्रीडा संकुल आणि कोरम मॉलजवळील शहीद तुकाराम ओंबळे बॅडिमटन कोर्ट विनानिविदा ठरावीक संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरातील विविध भागांत क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली असून ही संकुले संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचे कोणतेही ठोस धोरण अद्याप आखले गेलेले नाही. त्यात बदल व्हावा, यासाठी क्रीडा संकुले तसेच महापालिकेच्या वास्तू भाडेपट्टय़ावर देताना स्वारस्य अभिव्यक्ती देकार राबविण्याची घोषणा मध्यंतरी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली होती. तशा स्वरूपाचा धोरणाचा स्वतंत्र प्रस्तावही यंदाच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. मात्र, हे धोरण मंजूर करत असताना त्यापूर्वीच विनानिविदा ठरावीक ठेकेदारांना शहरातील दोन महत्त्वाची संकुले भाडेपट्टय़ावर देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कळवा-मुंब्रा भागात नेहमीच ‘संघर्षां’चा आव आणणाऱ्या एका राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या संस्थेस कौसा येथील भलेमोठे स्टेडियम कोणत्याही निविदेशिवाय यापूर्वीच बहाल करण्यात आले आहे. ठाण्यातील प्रमुख राजकीय नेत्यांसोबत जुळवून घेण्याच्या प्रशासकीय धडपडीतून हे निर्णय घेतले जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंब्रा राष्ट्रवादीचे ,ढोकाळी शिवसेनेचे?

ठाणे महापालिकेने कौसा येथे तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले आहे. हे स्टेडियम शहराबाहेर असल्याने येथील नागरिकांकडून त्याचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे एखाद्या संस्थेस हे स्टेडियम भाडेपट्टय़ावर दिल्यास नागरिकांचा येथील वावर वाढेल, असा तर्क लढविण्यात आला आणि मध्यंतरी कोणत्याही निविदेशिवाय ही वास्तू एका संस्थेस भाडेपट्टय़ावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. कळव्यात नेहमीच संघर्ष करत असल्याचा देखावा उभा करणाऱ्या एका राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या संस्थेस ही वास्तू भाडेपट्टय़ाने देण्यात आल्याची चर्चा असून, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यास विरोध केला आहे. मात्र, केळकर यांच्या विरोधाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. हे प्रकरण ताजे असताना सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून ढोकाळी येथे उभारलेले शरदचंद्र क्रीडा संकुल आणि ओंबळे बॅडमिंटन कोर्टसुद्धा अशाच पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर खासगी संस्थांच्या घशात घातले जाणार आहे. ढोकाळी येथील पवार मिनी स्टेडियम हे मे. संकल्प सेवा मंडळाला दिले जाणार आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या एका नेत्याशी संबंधित हे मंडळ असून क्रीडा क्षेत्रातील कोणताही ठोस अनुभव नसताना या संस्थेस हे संकुल चालविण्यात देणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर याच संस्थेची निवड कशी करण्यात आली याविषयी कोणतेही ठोस कारण प्रशासनाने प्रस्तावात दिलेले नाही. आणखी एका प्रस्तावात ओंबळे बॅडमिंटन कोर्ट हे कोणत्या संस्थेला देणार याबाबतचा उल्लेख नाही. मात्र, ही दोन्ही क्रीडा संकुले अभिव्यक्ती स्वारस्य देकारांचे धोरण अंतिम होईपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून द्यावेत, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

भाडेपट्टा धोरणही मंजूर

ठाण्यातील क्रीडा संकुले कशा पद्धतीने भाडेपट्टय़ावर द्यायची यासंबंधीचे धोरणही शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यास वेळ लागणार असल्याने ठाणेकरांसाठी उभारलेल्या वास्तू वापरात याव्यात यासाठी प्रायोगिक तत्त्वावर विनानिविदा भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. लवकरच यासंबंधी स्वारस्य अभिव्यक्ती करार करून निविदेद्वारे वाटप प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.