ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या आठवडाभरापासून शहरातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणामध्ये भव्य स्पर्धा होत आहेत. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये आणि क्रीडांगणांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ फेब्रुवारी रोजी महोत्सवांतर्गत राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन सकाळी ६ ते ९ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मोठय़ा प्रमाणात स्पर्धक भाग घेणार असल्याने स्पर्धेच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी म्हणून सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गावर बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना हे बदल लागू नसतील.

’ मुंबईकडून नाशिक व घोडबंदरच्या दिशेने, माजिवडा उड्डाण पुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ज्युपिटर हॉस्पिटलच्या पुढे उड्डाणपुलावर चढणीच्या ठिकाणी प्रवेश बंद. या वाहनांना कॅडबरी पूल आणि माजिवडा पुलाखालून मार्गक्रमणाची मुभा.
’ घोडबंदर व बाळकुमकडून मुंबई व नाशिककडे माजिवडा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उड्डाणपुलाच्या चढणीच्या ठिकाणी प्रवेश बंद. या वाहनांना या पुलाखालून कापुरबावडी सर्कल, गोल्डन क्रॉस व माजिवडा येथून इच्छित स्थळी जाता येईल.
’ घोडबंदर व बाळकुमकडून तत्त्वज्ञान सिग्नलहूून तुळशीधाम, वसंत विहारकडे जाणाऱ्या किंवा यू टर्न घेऊन जाण्यास तत्त्वज्ञान सिग्नल येथे प्रवेश बंद. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून कापुरबावडी सर्कल उड्डाणपुलाच्या खालून उजव्या बाजूने यू टर्न घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.
ठाणे मुंबईकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून यू-टर्न घेऊन कापुरबावडी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नल येथे यू टर्न घेऊन जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने तत्त्वज्ञान येथून सरळ घोडबंदर रोड मानपाडा पुलाखालून उजव्या बाजूने वळून जातील.
’ तुळशीधाम, वसंतविहारकडून तत्त्वज्ञान सिग्नल येथून कापुरबावडी सर्कल ठाणे-मुंबईकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नलवर प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने तत्त्वज्ञान सिग्नल येथून डाव्या बाजूने वळून घोडबंदर मार्गे मानपाडा ब्रिजखालून उजव्या बाजूने वळून इच्छित स्थळी जातील.
’ नाशिककडून मुंबईच्या दिशेने माजिवडा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस रुस्तमजीच्या पुढे उड्डाणपुलावर चढणीच्या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्गाने ही वाहने पुलाच्या खालील मार्गावरून इच्छित स्थळी जाऊ शकतील.