ठाणे येथील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या आदेशानंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे लेखी पत्र शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी रात्री उशिराने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

एमएमआरडीएमार्फत ठाणे, घोडबंदर भागात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या कामामध्ये तीन हात नाका भागातील झाडांचा अडसर होता. ही झाडे संबंधित ठेकेदाराने बुधवारी रात्री तोडली. या घटनेनंतर शहरात सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला. याप्रकरणी ठाण्यातील विविध सामाजिक संघटनांनी महापौर म्हस्के यांच्याकडे तक्रार केली होती.  त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश वृक्ष प्राधिकरण विभागाला दिले होते. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे. याप्रकरणी विनापरवाना वृक्षांच्या फांद्या छाटणारे अनिल पाटील (रा. मुंबई) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी पत्र दिले असून याप्रकरणी रात्री उशिराने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे