ठाणे : मुंब्रा येथे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका भिक्षेकरी महिलेच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्याला सहा दिवसांत अटक करून पोलिसांनी त्या मुलीला सुखरूप तिच्या आईकडे सोपवले. विशेष म्हणजे, ही भिक्षेकरी महिला मूक आणि कर्णबधिर असल्याने पोलिसांनी स्वत:हून या अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली आणि कसून तपास करून मायलेकींची पुन्हा भेट घडवून आणली.

मुंब्रा रेल्वे स्थानकात भिक्षा मागून राहणाऱ्या एका महिलेच्या तीन वर्षीय मुलीचे १७ एप्रिलला एका व्यक्तीने अपहरण केले होते. भिक्षेकरू महिला मुंब्रा पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची माहिती पोलिसांना देत होती. मात्र, महिलेला बोलता आणि ऐकता येत नव्हते. तिच्या हातवाऱ्यांच्या आधारे तिच्या मुलीचे अपहरण झाले इतकेच पोलिसांना कळत होते. महिला मूक-बधिर असल्याने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी स्वत: तक्रारदार होऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

महिला भिक्षेकरी असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्या पथकाने मुंब्रा ते मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सर्वच भिक्षेकरीची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी घाटकोपर रेल्वे स्थानकातील एका भिक्षेकरी मुलाने त्याच्या परिचयाच्या ‘टूकटूक’ नावाच्या भिक्षेकरीकडे एक लहान मुलगी पाहिल्याचे सांगितले. तसेच ‘टूकटूक’ मनमाडला निघून गेल्याची माहितीही या मुलाने दिले. त्याआधारे पोलिसांचे पथक मनमाडला रवाना झाले. मात्र आरोपी ठाण्यात आल्याची माहिती  मिळाली. त्यानंतर पथकाने ठाणे रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपीला आणि मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचे नाव सचिन जाधव असल्याचे सांगितले. मुलीची आई आपल्यासोबत राहत नसल्याने मुलीचे अपहरण केल्याची त्याने कबुली दिली.