News Flash

विसर्जनासाठी पोलीस, पालिका सज्ज

४,०२१ गणेशमूर्तीचे उद्या विसर्जन

दीड हजार पोलीस वसई तालुक्यात तैनात; ,०२१ गणेशमूर्तीचे उद्या विसर्जन

गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून मनोभावे सेवा करून घेणाऱ्या गणरायाला गुरुवारी, अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. वसई तालुक्यात गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली असून, पालिका प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहेत.तालुक्यात ४,०२१ गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तब्बल दीड हजार पोलिसांचा फौजफाटा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

वसई तालुक्यात यंदा ८१८ सार्वजनिक गणेश मंडळे तर २४ हजार १६० हून अधिक घरगुती मूर्तीची स्थापना करण्यात आली  होती. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांच्या वतीने करण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ  नये यासाठी पोलीस यंत्रणचा चोख बंदोबस्त आहे.  मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ  नये यासाठी विसर्जन मार्गावर तात्पुरते दुभाजक तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विसर्जन काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस प्रत्येक नाक्यावर तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे विसर्जन ठिकाणी सोयी-सुविधाबाबत तयारी करण्यात आली आहे.

पोलिसांचा बंदोबस्त

  • विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी वसई-विरार शहरात दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात ७१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • ५५ फिक्स पॉइंट असून फिरती गस्तपथक तैनात करण्यात आले आहेत.
  • विसर्जनस्थळी पोलिसांनी टेहळणी मनोरे उभारले आहे.
  • महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना टाळण्यासाठी साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले असून त्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहेत.
  • पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव बलाच्या तुकडय़ा, पोलीस मित्र, स्वयंसेवकांची फळी तैनात आहे.
  • पोलिसांनी नुकताच शहरातून मार्च काढला होता. वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गात बदल करून काही मार्ग एकदिशा केलेले आहेत.

७१ ठिकाणी पालिकेची व्यवस्था

तालुक्यातील विरार डोंगरपाडा, मनवेलपाडा, आचोळे, चक्रेश्वर, दिवाणमान, नायगाव, उमेळा व अन्य परिसरांतील तलावात आणि खाडीत अशा एकूण ७१ विसर्जन ठिकाणी महापालिकेतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वयंसेवक पथक नेमणे, विसर्जनासाठी तराफा, निर्माल्य कलश तसेच स्वयंसेवकांना लाइफ जॅकेट आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मीरा-भाईंदरमध्ये कडेकोट बंदोबस्त ; वाहतुकीत बदल!

अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाची जय्यत तयारी महापालिका प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

अनंत चतुर्दशीला मुख्य करून सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होत असते. बहुतांश गणेशमूर्ती भाईंदर पश्चिम तसेच भाईंदर पूर्व खाडीकिनारी विसर्जित केल्या जातात. दोन्हीकडचे रस्ते अरुंद असल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर भाईंदर पश्चिम व पूर्व भागातले सर्व रस्ते मिरवणुकीच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व वाहने गोल्डन नेस्टपर्यंतच सुरू राहतील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, इतर अधिकारी व कर्मचारी मिळून ६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाची एक तुकडी, शीघ्र कृती दलाची एक तुकडी, जलद प्रतिसाद दलाची दोन पथके जागोजागी तैनात करण्यात येणार आहेत, याशिवाय २०० पोलीस मित्र, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व इतर सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तसेच विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण विसर्जन प्रक्रियेवर महापालिकेचे व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी नजर ठेवून आहेत.

२९ बोटी, ३ क्रेन

महापालिकेतर्फे विविध ठिकाणी २९ बोटी, ३ क्रेन, ३ हायड्रा व ५ फोर्क लिफ्ट, २८ तराफे तैनात करण्यात आले आहेत. ५५ जीवरक्षक, तसेच ४०० कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 12:29 am

Web Title: tight security for ganesh idols immersion at vasai virar
Next Stories
1 वृक्षतोडीसाठी बिल्डर सरसावले
2 रात्रीस खेळ चाले.. वाहतूक कोंडीचा!
3 शेफलरच्या तंत्राला देशी जुगाडाची जोड
Just Now!
X