मखमली तलाव ते एसटी स्टॅण्ड परिसरातील बेकायदा बांधकामे तोडली
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करत येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त केल्यानंतर महापालिकेने मंगळवारपासून मखमली तलाव ते खोपट एसटी स्टॅड या मार्गावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. मूळ शहरातील वाहतूक कोंडीमुक्त व्हावी यासाठी खोपट रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे मानले जात आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात या मार्गावरील ६५ बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच पुढील दिवसांत येथील बेकायदा बांधकामे स्वत:हून काढा, असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेतले आहे. महापालिकेने आखलेल्या विकास आराखडय़ात नमूद केल्याप्रमाणे रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २८ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील महतत्त्वाकांक्षी रस्ता रुंदीकरण प्रकल्प हाती घेतल्यानंतर मंगळवारपासून खोपट रस्त्यावरील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले आणि साहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात पुढील काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
स्पेन येथून परतताच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खोपट येथील रस्ता रुंदीकरण कारवाई हाती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मखमली तलाव ते खोपट एसटी स्टँड या रस्त्यावरील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे ६५ बाधित बांधकामे निष्कासित केली. दरम्यान, जयस्वाल यांनी खोपट, पोखरण रोड नं.१, पोखरण रोड नं.२, कापूरबावडी जंक्शन तसेच रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून सर्व संबंधितांशी संवाद साधला आणि महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच वाढीव बांधकामे स्वत:हून काढण्यासाठी २४ तासांची मुदत दिली. या आवाहनाला प्रतिसाद देत आज बहुतांशी बांधकामे स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली. घोडबंदर सव्‍‌र्हिस रोड, पोखरण रोड नं.१, कापूरबावडी जंक्शन, बुधाजी नगर कळवा आणि स्टेशन परिसर रस्ता रुंदीकरण मोहिमेनंतर मखमली तलाव ते खोपट एसटी स्टँड या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम येत्या काळात हाती घेतले जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.