मध्य रेल्वेच्या मार्गावर दिवा स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारा लोकल गाडय़ांचा खोळंबा दूर करण्यासाठी ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी फाटक हटवून उड्डाणपूल उभारण्याची तयारी चालवली आहे. यासाठी पालिकेच्या मूळ विकास आराखडय़ातील आरक्षणे बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येईल.
दिवा स्थानकातून दररोज एक हजारहून अधिक रेल्वेगाडय़ा मार्गस्थ होतात. या स्थानकाजवळ असलेल्या रेल्वेक्रॉसिंगमुळे या गाडय़ांचा खोळंबा होतो. काही वेळा रेल्वे ट्रॅकवर येऊन अवजड ट्रक आणि अन्य वाहने बंद पडल्यास मध्य रेल्वेची पूर्ण वाहतूक विस्कळीत होते. या पाश्र्वभूमीवर रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता घाटकोपर यांनी ठाणे महापालिकेला यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ामध्ये पूर्वेकडील बाजूस ४५ मीटर रुंद रस्ता तर पश्चिमेकडील बाजूस २० मीटरचा रस्ता आहे. या रस्त्यांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामधील २० मीटरचा रस्ता रेल्वे हद्दीत बांधण्यात आला असून त्यावरून पाचव्या आणि सहाव्या रेल्वे रुळाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे आरक्षण रद्द करून नव्या रस्त्याची रेषा निश्चित करण्याकरिता विकास आराखडय़ात फेरबदल करण्यात येणार आहे. तसेच या भागातील वाहनतळ व उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडाचा काही भागही या रस्त्यासाठी देण्यात येणार आहे.
रेल्वे, रस्ते वाहतूक जलद होणार
दिवा स्थानकात होणाऱ्या पुलामुळे दिवा पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी वाहनांना फाटकावर तासन्तास वाट पाहावी लागणार नाही. तसेच फाटकाचा अडथळा दूर झाल्याने या भागात रेल्वेगाडय़ा खोळंबण्याचे प्रमाणही कमी होईल. तसेच पादचाऱ्यांनाही या पुलावरून रेल्वेमार्ग ओलांडता येणार असल्याने अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.