ठाणे महापालिकेचे उद्दीष्ट मात्र १० कोटींनी हुकले
tv05ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरातून महापालिका प्रशासनाने ३४५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० कोटींची वाढ झाली आहे. तसेच उथळसर, नौपाडा, सावरकर-लोकमान्य, माजिवाडा-मानपाडा या प्रभाग समित्यांसह मुख्यालयाने शंभर टक्के मालमत्ता कराची वसुली केली आहे. तर दुसरीकडे मुंब्रा परिसरातून जेमतेम ५० टक्के मालमत्ता कराची
वसुली झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यंदाच्या वसुलीत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे वर्तकनगर प्रभाग समितीला मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा ७० टक्क्य़ांपर्यंतही ओलांडता येऊ शकलेला नाही.
गेल्या वर्षी २९३ कोटी रुपयांचा मालमत्ता कराची वसुल झाल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदा मालमत्ता करासाठी ३५५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले होते. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात आयुक्त जयस्वाल यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये सुमारे ३०७ कोटी रुपयांची वसुली झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे आदेश देत आयुक्त जयस्वाल यांनी मालमत्ता कर वसुलीत हयगय केली जाणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला होता. यामुळे अखेरच्या आठवडय़ात ५० कोटी रुपयांची वसुली झाली .