‘इको टुरिझम’ प्रकल्प राबवण्यावर पालिका, वनखात्यात एकमत
मुंबई-ठाणे दरम्यान असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊरमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटन केंद्र (इको टुरिझम) उभारणीच्या निर्णयावर अखेर महापालिका आणि वनविभागाचे एकमत झाले आहे. या पर्यटन केंद्राचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवत महापालिकेने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव वनविभागाकडून मागविला आहे. त्याचप्रमाणे येऊर पर्यटन सेंटर आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्राच्या आराखडय़ास वनविभागाने तत्त्वत: मान्यता दिल्याने त्याच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याशिवाय, येऊरमधील तलावाचे महापालिका सुशोभीकरण करणार असून तिथे पर्यटकांना जाता यावे म्हणून वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी महापालिका वनविभागाला प्रस्ताव पाठविणार आहे. या तिन्ही प्रस्तावांमुळे येऊरला आता नवी झळाळी प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यालयात येऊरच्या प्रकल्पासंबंधी दोन दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली. त्या वेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) भगवान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग, ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, नगरअभियंता रतन अवसरमोल, शहर विकास विभागाचे अधिकारी प्रदीप गोयल आदी उपस्थित होते. या बैठकीत येऊरमधील पर्यावरणस्नेही पर्यटन केंद्र उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवत आयुक्त जयस्वाल यांनी त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव वनविभागाला सादर करण्यास सांगितले आहे.
सुप्रसिद्ध कलावंत आणि जगभरातील अक्षरधाम मंदिराचे मुख्य आरेखक अरुणकुमार यांनी येऊरमध्ये पयर्टन सेंटर आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यासंबंधीचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाचेही बैठकीमध्ये सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी वनविभागाने आराखडय़ास तत्त्वत: मान्यता देऊन यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यास सांगितले. त्याचबरोबर येऊरमध्ये तलावाचे सुशोभीकरण महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. हे सुशोभीकरण पर्यटकांना पाहता यावे म्हणून तिथे वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे. मात्र वनविभागाच्या परवानगीशिवाय ही सेवा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे वनविभागाने पालिकेला याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
रुंदीकरणातील अडथळे दूर..
घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सेवा रस्ते तयार करण्याचे काम महापालिकेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले आहे, मात्र वनविभागाच्या जागेमुळे चार ठिकाणी कामात अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वाइल्डलाइफ बोर्डाकडे हा मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच पातलीपाडा येथील उद्यान आणि टिकुजिनी वाडी भागातील रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीचाही प्रस्ताव वनविभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, टिकुजिनी वाडी येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वनविभागाने बैठकीत मान्यता दिल्याने आता या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. तसेच टिकुजिनी वाडी येथील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामासाठी परिसरातील बेकायदा बांधकामे हटविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर ते गायमुख हा रस्ता वनविभागाच्या जागेतून जाणार आहे. या रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण सुरू असल्यामुळे नेमकी किती जागा लागेल हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण होताच वनविभागाने त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

वनांना झळाळी
’ येऊरमधील सुमारे दीड एकर जागेमध्ये पयर्टन केंद्र आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणतीही वृक्षतोड न करता तसेच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी या प्रकल्पात घेतली जाणार आहे.
’ या पर्यटन केंद्रामध्ये देशभरातील आदिवासींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र असणार आहे. त्यामध्ये कपडे, दागिने, चित्रे आदींचा समावेश असणार आहे. तसेच केंद्राच्या निमित्ताने आदिवासी कलेला एक व्यासपीठ आणि बाजारपेठ मिळणार आहे.
’ चुलीवरचा रुचकर स्वयंपाक, रात्रीच्या वेळी मध्यवर्ती खुल्या व्यासपीठावर आदिवासी नृत्य, संगीताची मेजवानी असणारे कॅम्पफायर, निवासासाठी पंचतारांकित सुविधा असणाऱ्या पारंपरिक झोपडय़ा आणि आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे दृक्श्राव्य सादरीकरण, यांचाही केंद्रामध्ये समावेश असणार आहे.