नादुरुस्त गाडय़ांमुळे ३२५ पैकी १४० बसगाडय़ाच रस्त्यावर; दररोज अडीच ते तीन लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी
एकीकडे ठाणे शहरात बेकायदा धावणाऱ्या खासगी बसचालकांची दादागिरी वाढत असतानाच दुसरीकडे मात्र ठाणे महापलिका परिवहन (टीएमटी) उपक्रमातील सुमारे तीसहून अधिक बसेस दररोज बंद पडत असल्याची बाब पुढे आली आहे. तसेच शहरातील प्रवाशांच्या तुलनेत टीएमटीच्या ताफ्यातील बसेसचा आकडा कमी असतानाच सव्वा तीनशेपैकी जेमतेम १४० बसेस रस्त्यावर प्रत्यक्षात धावत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या टीएमटीला दररोज अडीच ते तीन लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, बसेस बंद पडत असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत शहरामध्ये सुमारे १९० बसेस धावत असल्याचा दावा टीएमटीचे व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी केला आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे सव्वा तीनशेहून अधिक बसगाडय़ा असून त्यापैकी प्रत्यक्षात १४० बसेस रस्त्यावर धावतात. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही मार्गावर सुमारे १८० ते १९० बसेस धावत होत्या, मात्र त्यापैकी ३० ते ४० बसेस सातत्याने रस्त्यावर बंद पडत असून त्यामुळे शहरातील विविध मार्गावरील सुमारे ६० ते ७० फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की टीएमटीवर ओढावत आहे. बसेस बंद पडत असल्यामुळे टीएमटीला दररोज सुमारे अडीच ते तीन लाखांचा आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. आधीच आर्थिक संकटांचा सामना करत असतानाच बंद बसेसमुळे टीएमटीच्या संकटांमध्ये आणखी भर पडली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नियमानुसार एक लाख लोकसंख्येला ३० बसेस असणे गरजेचे आहे. त्यानुसार ठाणे शहरातील लोकसंख्येच्या मानाने सुमारे सहाशे बसेसची आवश्यकता आहे. येत्या काही महिन्यांत टीएमटीच्या ताफ्यात १९० नवीन बसेस दाखल होणार आहेत. असे असतानाच सातत्याने बंद पडणाऱ्या जुन्या बसेसमुळे मात्र साडेतीनशेचा आकडाही कमी होण्याची शक्यता आहे. नव्या नादुरुस्त बसेसची भर पडत आहे. त्यामुळे आगारात बसेस उभी करण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याचे समोर येत आहे.

खासगी, अन्य बससेवांचे फावले
ठाणे ते बोरिवली या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण, आधीच ताफ्यात बसेस कमी असल्यामुळे टीएमटीला या मार्गावर पुरेशी सेवा देणे शक्य होत नाही. याचा फायदा खासगी बसचालक घेत असून या बसेस ठाणे ते घोडबंदर या मार्गावर सातत्याने फेऱ्या मारून टीएमटीचे प्रवाशी पळवीत असल्याचे चित्र आहे. याशिवाय, बेस्ट, नवी मुंबई आणि वसई-विरार परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ाही या मार्गावर फेऱ्या मारतात.