चरईतील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : येथील कोर्टनाका परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार असून या कामामुळे आज, शनिवारी उथळसरसह ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कामादरम्यान, चरई परिसरात पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पालिका उपाययोजना करणार आहे.

ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील जलकुंभाच्या छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी २० दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे जलकुंभाला जोडण्यात आलेली जलवाहिनी आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जोडण्यात आली असून त्याद्वारे परिसराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच कोर्टनाका परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे तिच्या दुरुस्तीचे काम पालिका हाती घेणार आहे. या कामामुळे उथळसर भागाचा पाणीपुरवठा शनिवार, ६ मार्च रोजी सकाळी ९ ते रविवार ७ मार्च रोजी सकाळी ९ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

चरई परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याबाबत येथील रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. नौपाडा तसेच उथळसर भागामध्ये यापूर्वीच नव्या जलवाहिन्या टाकल्या असल्या तरी काही नळजोडण्या जुन्या वाहिनीवर आहेत, तर काहींनी जुन्या जलवाहिन्यांवरील नळजोडण्या तशाच ठेवून नव्या जलवाहिनीवर नळजोडण्या घेतल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कोर्टनाका आणि गावदेवी या दोन्ही भागांत जुन्या जलवाहिनीवर झडपा बसवून ती बंद करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

या भागांत पाणी नाही

या बंदमुळे जेल जलकुंभ, सिद्धेश्वर जलकुंभ आणि साकेत जलवाहिनीअंतर्गत परिसरातील चरई, उथळसर, धोबीआळी, राबोडी, जेल परिसर, साकेत कॉम्प्लेक्स, कोर्ट नाका, खारकर आळी, महागिरी, नागसेननगर, सिडको बस थांबा परिसर या ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.