कामे पूर्ण होईपर्यंत लागू राहणार

ठाणे : घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे होणारी कोंडी सोडविण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल केले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या कामासाठी महामार्गावर मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. विजय गार्डन सिग्नलजवळ रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी वनविभागाच्या जागेमुळे सेवा रस्ता जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य मार्गावरून एका वेळी दोनच वाहने पुढे जातात. त्यात सिग्नलवरून विजय गार्डन आणि कावेसर भागात जाणारी वाहने उजवीकडे वळण घेण्यासाठी थांबत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी भेदण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यासंबंधी चाचपणी सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिनाभरापासून विजय गार्डन येथील सिग्नल बंद करण्यात आला असून या सिग्नलमार्गे उजवीकडे वळण घेऊन विजय गार्डन आणि कावेसर भागात जाणारी वाहतूक वाघबीळ उड्डाण पुलाखालून तसेच आनंदनगर भागातून वळविण्यात आली आहे. तसेच विजय गार्डन सिग्नलजवळील डी-मार्ट आणि कासारवडवलीजवळील जी-कॉर्प येथील सेवा रस्त्यावरून ठाणे मार्गिकेवर जाणारी वाहने आनंदनगर भागातून रस्ता ओलांडायची. मात्र, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्यामुळे आनंदनगर सिग्नलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्यावरून दुपारी १२ ते ४ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने कासारवडवली चौकातून सोडण्यात येत आहे.

प्रायोगिक तत्वावर गेल्या महिनाभरापासून लागू केलेल्या वाहतूक बदलांमुळे वाहतूक कोंडी ७० टक्के सुटली आहे. मेट्रोचे काम होईपर्यंत हा बदल लागू राहणार आहे.

– प्रकाश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा