अचानक बदलामुळे ठाणे, ऐरोली, भिवंडीत कोंडी

नारळी पौर्णिमा उत्सवासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी शनिवार सकाळपासूनच कळवा पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करून या मार्गावरील वाहतूक खारेगाव आणि ऐरोलीमार्गे ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर वळविली. आधीच मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्यामुळे अवजड वाहतुकीच्या भारामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी होत असतानाच त्यात कळव्यातील बदलामुळे वाहनाचा भार आणखी वाढून शहरात सायंकाळी अभूतपूर्व कोंडी झाली.

या कोंडीमुळे तीन हात नाका ते कॅडबरी जंक्शन या पाच ते सात मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तासांचा अवधी लागत होता. महामार्गावरील कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत वाहतुकीला बसल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. ठाणे वाहतूक पोलिसांनी अचानक शनिवारी लागू केलेल्या कळव्यातील बदलांमुळे एकूणच ठाणे, ऐरोली आणि भिवंडीतील वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र होते. या कोंडीमुळे नियोजन फसल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी कळवा पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू केली. मात्र, रात्री उशीरापर्यंत शहरांमधील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आलेली नव्हती.

दुरुस्तीच्या कारणास्तव मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी बंद असून त्यामुळे शहरातील कोंडी अजूनही सुटू शकली नसतानाच या अनपेक्षित बदलाची त्यात भर पडली. नवी मुंबईहून घोडबंदर, भिवंडी आणि ठाणे शहरात जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा पूल महत्वाचा मानला जातो. असे असतानाही तो वाहतुकीसाठी बंद करून या मार्गावरील वाहतूक ऐरोली आणि खारेगाव मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरुन वळविण्यात आली. या बदलासंबंधीची अधिसूचना अचानक काढल्यामुळे बदलाविषयी नागरिक अनभिज्ञ होते. या बदलांमध्ये नवी मुंबईकडून येणारी वाहने बुधाजी नगर येथून कळवा स्थानक, सहकार विद्यालय, पारसिक सर्कल, खारेगाव मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरूनठाण्याच्या दिशेने वळविण्यात आली होती. तर नवी मुंबईतून येणारी अवजड वाहने पटणीवरुन ऐरोलीमार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरून सोडण्यात येत होती. या वाहनांचा भार वाढल्यामुळे आधीच अवजड वाहतुकीने दबलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड कोंडी झाली. नवी मुंबईकडून विटाव्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कोपरी, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा, कापूरबावडी, घोडबंदर, माणकोली आणि रांजणोली भागात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. त्यामुळे सायंकाळी कामावर निघालेला नोकरदार वर्ग कोंडीत अडकून पडला होता. या संदर्भात, ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मुंबई-नाशिक महामार्ग रखडला..

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने या मार्गावरून खासगी आणि परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांमधून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले होते. या कोंडीत अनेकजण दीड ते दोन तास अडकून पडले होते. त्यामुळे या नागरिकांकडून वाहतूक बदलांबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. कळव्यातील बदलामुळे कळवेकरांना ऐरोली आणि खारेगाव मार्गे वळसा घालून कोंडीतून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे कळवेकरांमधूनही प्रचंड संताप व्यक्त होत होता. कळवा पुलाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाली होती.

पहिल्यांदाच कळवा पूल बंद

नारळी पौर्णिमेच्या उत्सवासाठी जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात यायचा. मात्र, हा पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे यंदा उत्सवासाठी बाजूला असलेल्या दुसऱ्या खाडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. उत्सवासाठी हा पूल बंद करण्याची ही पहिलीच वेळ असून त्याबद्दलही नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

अवजड वाहनांची अधिक भर

मुंबई-नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ या वेळेत वाहतुकीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यांची अवेळी वाहतूक सुरू असल्याने कोंडी होत असतानाच त्यात कळवा बदलांचा भर पडून कोंडीत वाढ झाली. एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे चित्र होते.