12 December 2019

News Flash

तीन हात नाक्याची मेट्रोमुळे कोंडी

अनावश्यक मार्गरोधकांमुळे खोळंबा

(संग्रहित छायाचित्र)

अनावश्यक मार्गरोधकांमुळे खोळंबा

ठाणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले नसतानाही मार्गरोधक लावण्यात आल्यामुळे तीन हात नाका परिसरात वारंवार कोंडी होऊ लागली आहे. तेथील उड्डाणपुलाच्या पायथ्यालगतचा मार्ग चिंचोळा झाल्याने सायंकाळी मुंबई-ठाणे मार्गिकेवर मोठी वाहनकोंडी होत असून त्याचा फटका संपूर्ण चौकातील वाहतुकीला बसत आहे.

ठाणे तसेच घोडबंदर भागातील सार्वजनिक वाहतुकीसाठी नवा पर्याय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी एमएमआरडीएने ठाणे तसेच घोडबंदर भागात महामार्गालगत मार्गरोधक लावून माती परीक्षण सुरू केले आहे. ज्या ठिकाणी खांबांची उभारणी करण्यात येणार आहे, तिथे हे परीक्षण केले जात आहे. तरीही खांबाच्या जागेव्यतिरिक्त अन्य भागांतही मार्गरोधक लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे.

या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एमएमआरडी तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिथे खांब उभारले जाणार आहेत, तिथेच मार्गरोधक लावण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र त्यानंतरही एमएमआरडीएकडून मार्गरोधक हटविण्यात आलेले नाहीत.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरही मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी मार्गरोधक बसविण्यात आले आहेत. मुंबई-ठाणे मार्गिकेवरील रस्त्याचा काही भाग आणि पदपथ मार्गरोधकांनी व्यापला आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील तीन हात नाका उड्डाणपुलाच्या पायथ्यालगतचा मार्ग चिंचोळा झाला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. विविध परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ांसह खासगी, परराज्यांतील बसगाडय़ांची वाहतूकही या मार्गावरून सुरू असते. चिंचोळ्या मार्गामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

चौकात कोंडी..

सायंकाळी नोकरदारांची वाहने तीन हात नाका चौकातून ठाण्यात येतात. त्यांची संख्या मोठी असते. चौकातील सिग्नलवरून सुटलेली वाहने उड्डाणपुलाच्या पायथ्यालगत असलेल्या चिंचोळ्या मार्गाजवळ अडकून पडतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा चौकापर्यंत पोहोचतात आणि सिग्नल यंत्रणा कोलमडते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीला ३१ जानेवारीपर्यंत मार्गरोधकाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामुळे हे मार्गरोधक बसविण्यात आले असून त्या ठिकाणी लवकरच काम सुरू होणार असल्याचे कंपनी प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

First Published on February 6, 2019 2:44 am

Web Title: traffic deadlock at teen haath naka due to metro work
Just Now!
X