राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रस्ता रूंदीकरणाची संथपणे सुरू असलेली कामे, रस्त्यालगत उभे राहणारे अनधिकृत फेरीवाले, वाहने, अवजड वाहनांची वाहतूक आणि रस्त्याची झालेली दैना यामुळे कल्याण शिळफाटा मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

दररोज सायंकाळी शिळफाटा, देसाई गाव, निळजे, काटई, दुर्गाडी पुल, कोनगाव या भागात मोठय़ाप्रमाणात वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. अवघ्या १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा मार्ग कोंडीचा ठरत असल्याचे चित्र आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे उपनगरीय रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ठाण्यापलिकडे राहणाऱ्या हजारो वाहन चालकांना कल्याण शिळफाटा मार्गे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहर गाठावे लागत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने हे रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत. मात्र, रुंदीकरणाच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. तर, शिळफाटा येथे काही ठिकाणी रस्त्याकडेला अनधिकृत फेरीवाले, विक्रेते आणि वाहनांनी रस्ते अडविले आहेत. तसेच अवजड वाहनांची वाहतूकही सुरू असते. दररोज शिळफाटा चौक, खिडकाळी, देसाईगाव, निळजे, काटई, खोणी, दुर्गाडी पूल आणि कोनगाव भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागातून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या हजारो वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. वाहन चालकांना अवघ्या १५ मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी पाऊण तास लागत आहे. वेळेत कामावर पोहचता येत नसल्याने वाहन चालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाने रस्त्यालगत उभी असलेली वाहने, फेरीवाल्यांना हटवावे तसेच या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.

कोंडीची कारणे

– रस्ता रूंदीकरणासाठी एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत अरूंद रस्ता आहे.
– रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनांचा वेगही मंदावतो. काटई, निळजे, देसाईगाव भागात याचा सर्वाधिक परिणाम.
– महापे शीळफाटा चौकाजवळ रिक्षा चालक चौक अडवतात. तसेच याठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे महापेहून कल्याण, मुंब््रयाकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो.
– अनेक ठिकाणी रस्त्यालगत फेरीवाले आणि वाहनेही उभे असता. महिन्याभरापूर्वी प्रशासाने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वाहने उभी केली जात आहेत.