ठाणे येथील साकेत भागातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. येत्या शनिवारी सकाळपासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असून या कामासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भिवंडी तसेच कळवा मार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत परिसरात असलेल्या खाडीपुलाचे बांधकाम १९८२ मध्ये करण्यात आले होते. या पुलाचे काम कॅन्टी लिव्हर पद्घतीने करण्यात आले असून हा पूल सहा ठिकाणी सांध्यांमध्ये जोडण्यात (एक्सपान्शस जॉइंटस) आला आहे. सांध्यातील जोडणीचा भाग उंच-सखल झाल्यामुळे पूल नादुरुस्त झाला आहे. याशिवाय, डांबरीकरणांमुळे पुलावर डांबराचे थर वाढले असून त्याचाही भार पुलावर वाढला आहे.

या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही सह पोलीस आयुक्त डुम्बरे यांनी दिली.

साकेत खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम करण्यात येणार असून हे काम येत्या २१ मे पासून सुरू करण्यात येणार असून या कामासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत नाशिकहून मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गिकेवरील वाहतूक भिवंडी तसेच कळवा मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक बदल..

  • नाशिकहून घोडबंदरला जाणारी हलकी वाहने रांजनोली किंवा मानकोलीनाका मार्गे कशेळी पुलाद्वारे पारसिक किंवा ठाणे शहरामध्ये जाऊ शकतील.
  • नाशिकहून मुंबई किंवा घोडबंदरला जाणारी सर्व प्रकारची जड वाहने येवई फाटा, आमने फाटा, सावदगाव, बापगाव मार्गे कल्याण गांधारी ब्रिज- कल्याणफाटा ते कळंबोली मार्गे नवी मुंबईत प्रवेश करून वाशी पुलामार्गे जातील.
  • नवी मुंबई येथून ठाणे किंवा घोडबंदरच्या दिशेने येणारी वाहने वाशी पुलाद्वारे मुंबईतून प्रवेश करून पूर्व द्रुतगती मार्गे जाऊ शकतील.

नागरिकांना आवाहन

मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत परिसरातील खाडी पुलाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे या मार्गे होणारी वाहतूक भिवंडी तसेच कळवा मार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण येऊन कापूरबावडी, कळवा, क्रीकनाका, मुंब्रा-व्हाय जंक्शन, शिळफाटा या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग वाहनचालकांची विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा प्रयत्न केला तर वाहतूक कोंडीत आणखी भर पडू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी ही काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केले.