वृक्ष प्राधिकरणकडून गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात अनेक भागांत करण्यात येत असलेल्या डांबरीकरणाचा फटका वृक्षांना बसत आहे. झाडांच्या मुळांनाच डांबरीकरणाची चादर लावली जात असल्यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन कालांतराने झाडे मृत पावत असल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या  रस्ते, नाले व डांबरीकरणाच्या कामा वेळी योग्य उपाययोजना आखण्यात येत नसल्यामुळे झाडांचेच डांबरीकरण व काँक्रीटीकरण केले जात आहे. झाडांच्या सभोवतालची जागा मोकळी ठेवणे आवश्यक असते परंतु डांबरीकरण व काँक्रीटीकरण केल्याने झाडांना मिळणारी हवा, पाणी व पोषकत्व यांच्यावर विपरीत परिणाम होतो. काही ठिकाणी तर डेब्रिस, विटा आदी झाडांमध्ये टाकले जात आहे. त्याचा झाडांच्या मजबुतीकरण व वाढीवर देखील गंभीर परिणाम होत आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाने पालिकेच्या बांधकाम विभागास झाडांच्या सभोवताली डांबरीकरण व काँक्रीटीकरण करू नये तसेच ठेकेदारांना तशा सूचना द्याव्यात असे वेळोवेळी कळवले होते. या प्रकरणी वृक्ष प्राधिकरण विभागाने झाडांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदारांवर नागरी झाडांचे जतन व संवर्धन कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार केला. तसेच बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास समज देण्याचे देखील म्हटले आहे. परंतु पालिका प्रशासनाने बांधकाम विभागास तेच ठेकेदारांना पाठीशी घालत अद्याप त्या प्रस्तावास मंजुरी देण्यास टोलवाटोलवी चालवली आहे.

यापूर्वी झाडांच्या बुंध्याशी अनेक कंत्राटदार डांबर, काँक्रीट, खडी टाकून झाडांच्या नैसर्गिक वाढीला धोका निर्माण करत असल्याचे वरिष्ठांना कळवले आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.

– हंसराज मेश्राम, उद्यान निरीक्षक, मीरा-भाईंदर महानगरपालिका