विकासकामांच्या नावावर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील सहा हजार झाडांची कत्तल

राज्यात सर्वत्र कोटय़वधींच्या वृक्षलागवडीचा संकल्प सोडण्यात आला असला तरी विकासकामांच्या नावाखाली हजारो झाडे तोडली गेल्याने वृक्षारोपणाचा हेतूच फोल ठरतो आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील पूर्व भागात असलेल्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने तोडण्यात आलेल्या झाडांमुळे यावर प्रकाश पडला. गेल्या दशकभरात अशाच प्रकारे विकासकामांच्या नावाखाली सहा हजार झाडे तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वृक्षारोपणात जगलेल्या झाडांपेक्षा तोडलेली झाडांची संख्याच अधिक असण्याची शक्यता आहे.

राज्यात १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार सरकारी माहितीनुसार हे लक्ष्य पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे. मात्र त्याआधी लागवड केलेली जुनी झाडे टिकवण्यात मात्र शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. १ जुलै रोजी लावण्यात आलेल्या पालिका क्षेत्रातील आणि तहसील क्षेत्रातील किती झाडे जगली आहेत, याची माहिती एकाही यंत्रणेकडे नाही. त्यात शहरातील जुन्या झाडांच्या कत्तलीसाठी मोठय़ा प्रमाणावर परवानगी देण्यात येत असून त्यामुळे शहरातील जुनी झाडे बेसुमारपणे तोडली गेली आहेत. गेल्या पाच वर्षांत शहरात सहा हजार झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात विकासकामांचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र विकासाच्या नावाखाली एकीकडे झाडांची कत्तल करायची आणि दुसरीकडे मात्र वृक्षारोपण मोहिमेतून कोटय़वधी झाडांची लागवड करायची, अशा प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या हाती घेण्यात आले असून त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली वास्तू मोठी करावी लागणार आहे. यासाठी छोटय़ा मंदिराशेजारी असलेल्या वड, उंबर आणि पिंपळाच्या झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली जुनी झाडे तोडली गेली आहेत. त्यात विशेष बाब म्हणजे यासाठीची परवानगी देताना या झाडांची पाहणीही केली जात नाही, असे समोर येते आहे. याबाबत पालिकेचे वृक्षप्राधिकरण अधिकारी दीपक चव्हाण यांच्यीशी विचारले असता, त्यांनी समितीने दिलेल्या मंजुरीवरच आम्ही पुढील कारवाई करतो असे उत्तर दिले. तसेच वृक्ष समितीच्या सभापती आणि नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांना विचारले असता, याबाबत वृक्षांची पाहणी केली नसल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच यापुढे अशा झाडांची स्वत: शाहनिशा केल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांत अंबरनाथ पालिका प्रशासनाने हजारो वृक्षांची लागवड केली. मात्र त्यातील किती झाडे जगली आणि मोठी झाली, याची अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. हिरवळ वाढण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या लागवडीमुळे कंत्राटदारांचे मात्र उखळ पांढरे होते.

प्रशासनाची उदासिनता

पालिकेकडून रस्ते रुंदीकरण आणि इतर विकासकामांसाठी वृक्ष तोडल्यास त्याची भरपाई घेण्यात येते. मात्र त्या पैशांतून किती झाडे लावली गेली याचीही माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे रस्ते रुंदीकरण केल्यानंतर किती झाडे लावली याचीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही.अधिकृत आकडेवारीनुसार पंधरा वर्षांत सहा हजार झाडे परवानगीने तोडण्यात आली. मात्र बेकायदा केलेल्या वृक्षतोडीच काय, असा सवालही  उपस्थित होतो आहे.