बदलापूर पालिकेचा ‘स्मार्ट’ कारभार, सव्‍‌र्हे क्रमांकाऐवजी प्रभागांचा उल्लेख

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या वृक्षरोपांच्या लागवडीतील मोजकीच झाडे शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले होती. त्यात आता यंदाच्या वर्षांत होणारे वृक्षारोपण जुन्याच जागेवर होणार असून कागदोपत्री फक्त ठिकाणाची नावे बदलली असल्याची बाब उघड झाली आहे. यंदाच्या वृक्षारोपणाच्या यादीत सव्‍‌र्हे क्रमांकाच्या ऐवजी प्रभाग क्रमांक टाकून स्मार्ट कारभार दाखविण्यात आला आहे.

नगरपालिकेत वृक्ष रोप लागवडीखाली पैसारोपण सुरू असल्याची बाब  ‘लोकसत्ता ठाणे’ने उजेडात आणली होती.

हजारो वृक्ष लावले गेल्याची बतावणी करत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात खूप कमी रोपे अस्तित्वात आहेत. त्यामुळे पालिकेकडून केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. असे असले तरी जुन्या लावलेल्या वृक्षांचे आकडे मात्र फुगलेलेच आहेत, तर नव्याने १५ हजार वृक्ष लावण्याची तयारी पुन्हा एकदा पालिकेने सुरू केली आहे. यातही एक धक्कादायक बाब समोर आली. ज्या ठिकाणी गेल्या वर्षांत वृक्षरोपण करण्यात आले होते, त्याच ठिकाणी पुन्हा वृक्ष लावले जाणार आहेत. त्यासाठीही हजारो वृक्षांची भली मोठी यादी तयार आहे.

गेल्या वर्षांत ज्या ठिकाणी झाडे लावली गेली, त्या वेळी त्या ठिकाणांचा उल्लेख सव्‍‌र्हे क्रमांक टाकून करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षांत झाडे लावण्याची ठिकाणे ही तेथील ओळखीचे ठिकाण आणि त्या जागेचा प्रभाग क्रमांक या नावाने नमूद करण्यात आली आहेत. गेल्या वर्षांत एरंजाड येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३५ येथे झाडे लावण्यात आली होती. यंदा तेच ठिकाण प्रभाग क्रमांक३ असे नमूद केले आहे. तेथून जवळच असलेल्या सव्‍‌र्हे क्रमांक १५ यंदा संविधान बंगल्यामागे सोनिवली असे नमूद केले आहे, तर कान्होर येथील सव्‍‌र्हे क्रमांक १३ प्रभाग क्रमांक १९ असे सांगितले आहे. अशी अनेक ठिकाणे नाव बदलून नमूद करण्यात आली आहेत.