News Flash

रानकेळीच्या पानांमधून लाखो रुपयांची उलाढाल

श्रावण, भाद्रपद महिन्यांत रानकेळीच्या पानांना विशेष महत्त्व

आदिवासी महिला रानकेळीच्या पानांचे भारे बांधून रेल्वे स्थानकात घेऊन येतात.

श्रावण, भाद्रपद महिन्यांत रानकेळीच्या पानांना विशेष महत्त्व; आदिवासी महिलांना रोजगार

भगवान मंडलिक, कल्याण

शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला परिसर तसेच कसारा येथील जंगलातून रानकेळीची पाने मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरात विक्रीसाठी आणून आदिवासी महिला जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये एकूण पाच ते १० लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. जुलैपासून अनेक सण, उत्सव सुरू होतात. श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत केळीच्या पानांना विशेष महत्त्व असते. शहरी भागांतील वाढती मागणी विचारात घेऊन आदिवासी महिला मोठय़ा प्रमाणात दररोज रानकेळींची पाने मुंबई-ठाण्यात घेऊन जातात.

माहुली किल्ल्याचा डोंगर, पायथा, वासिंद, कसारा, आटगाव, खर्डी या गावांच्या परिसरात जंगलात रानकेळीचे जंगल आहे. या गावांच्या परिसरातील आदिवासी महिलांना या जंगलातील रानकेळीची पाने खुडून शहरात विक्रीसाठी आणतात. पावसाळ्यात जंगलातील झाडे, झुडपे, गवत मोठय़ा प्रमाणात वाढते. या घनदाट जंगलातून रानकेळीच्या झुडपांपर्यंत पोहोचणे मोठे दिव्य असते. अनेकदा जंगली श्वापद, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे यांचा वावर या भागात असल्याने त्यांची भीती आदिवासी महिलांना असते. तरीही ते आव्हान स्वीकारत या जंगलात जातात.

भात, नागली, वरई लागवडीची कामे जुलै महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आदिवासी महिला-पुरुषांच्या हातांना काम राहत नाही. या महिला दिवसा जंगलात जाऊन केळीची पाने विळा, कोयत्याने काढण्याचे काम करतात. एक महिला दिवसभरात ३०० ते ४०० पाने काढते. ही पाने जंगलातून बाहेर काढून सपाटीला माळरानावर आणली जातात. तिथे स्वच्छ वाहत्या पाण्यात धुतली जातात. या पानांचे भारे (गठ्ठे) बांधले जातात. एकेका भाऱ्यात १०० ते १२५ पाने असतात. एका भाऱ्याचे वजन ५० ते ६० किलो असते. हे भारे डोक्यावरून जंगलातून तीन ते चार किलो मीटरची पायपीट करून कसारा, आटगाव, आसनगाव, वासिंद रेल्वे स्थानकात आणले जातात. ते लोकलने कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड भागात किरकोळ, घाऊक पद्धतीने विकले जातात. एक केळीचे पान पाच ते १० रुपयांना विकले जाते. दोन महिन्यांत आदिवासी महिलांना केळीच्या पानाच्या निमित्त रोजगार मिळतो. हाच पैसा गाठीशी बांधून आदिवासी महिला घरखर्च, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. अतिशय कष्टाचे काम असूनही काटक असल्याने आम्हाला कोणती इजा, आजार होत नाही, अशी माहिती श्रावणी वाघे या महिलेने दिली. लागवडीचा हंगाम संपल्यानंतर बसून राहण्यापेक्षा केळीच्या पानांना श्रावण महिन्यात चांगली मागणी असते. शहरातील लोक या पानांना जेवणासाठी अधिक पसंती देतात. भाद्रपद महिन्यातही या पानांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे घराजवळील जंगलात ही पाने मिळत असल्याने आम्ही दोन महिने केळीची पाने विकण्याचा व्यवसाय करतो. त्या माध्यमातून दोन पैसे मिळतात. पुढील घरखर्च चालवणे शक्य होते, असे बुगीबाई भांगरे या महिलेने सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:51 am

Web Title: tribal women earn good income from wild banana leaves sell zws 70
Next Stories
1 आयुक्त-नगरसेवक संघर्ष चिघळणार?
2 राष्ट्रवादीचे गटनेते भाजपच्या वाटेवर?
3 वाहतूक पोलिसांमुळे तरुणीचे प्राण वाचले
Just Now!
X