ठाणे : शिळ येथील शिळगाव भागात घरातील लाकडी फळ्या (प्लायवूड) अंगावर पडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला आहे. मंजू चौरसिया (९) आणि रंजू चौरसिया (११) अशी या दोघींची नावे आहेत.

शिळगाव येथील लोणच गल्ली परिसरात मंजू आणि रंजू या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या घरातील पुढील भागात लाकडाचे गोदाम आहे. त्यामुळे या गोदामात लाकडी फळ्यांचा थर रचण्यात आला होता. रविवारी रात्री घरात डास झाल्याने मंजू आणि रंजू या दोघीही धूर करण्यासाठी लाकडी फळ्यांजवळ गेल्या. त्या वेळी एक कुत्रा फळ्यांच्या थरावर चढल्याने सर्व फळ्या मंजू आणि रंजूच्या अंगावर पडल्या. कुटुंबीयांनी फळ्या बाजूला करून  दोघींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.