दररोज एकूण ३.२ टन निर्मिती

ठाणे :  शहरातील पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयाशेजारी महापालिका आणि एमएमआरडीएने गेल्या दहा दिवसांत उभारलेल्या प्राणवायू निर्मितीच्या दोन प्रकल्पाचे लोकापर्ण शनिवारी करण्यात आले. या दोन्ही प्रकल्पातून दररोज ३.२ टन इतका प्राणवायू निर्माण होणार असून यामुळे रुग्णालयातील ३०० खाटांना प्राणवायू पुरवठा करणे शक्य होणार आहे. शहरात असे एकूण चार प्रकल्प उभारले जाणार आहेत.

करोना रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि एमएमआरडीएने हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याचे शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. हे दोन्ही प्रकल्प पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत असून त्यातून दिवसाला ३.२ टन प्राणवायू निर्माण होणार आहे.  तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाणे प्रमाणित केलेला हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या प्रकल्पामध्ये हवेतील प्राणवायू विशिष्ट पध्दतीने टाकीमध्ये साठविण्यात येतात. या हवेतील अशुध्द घटक वेगळे करण्यात येतात. या दोन्ही प्रकल्पांतुन प्रती दिवस ३५० सिलेंडर इतका प्राणवायू निर्माण होणार आहे. एका प्रकल्पाद्वारे ८५० लिटर प्रती मिनिट इतका प्राणवायू निर्माण होणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून प्रती दिवस  सुमारे ३.२ टन प्राणवायू मिळणार असून त्याद्वारे रुग्णालयातील ३०० खाटांना प्राणवायू पुरवठा करणे शक्य होणार आहे.