बदलापुरातील औद्योगिक सांडपाण्यामुळे किनाऱ्यावर मृत माशांचा खच;

ठाणे, कल्याणकरांचा जलस्रोत असलेल्या नदीच्या पाण्यावर काळा तवंग

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक महापालिकांसह कल्याण तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीचे पाणी दिवसेंदिवस विषारी बनू लागले असून मंगळवारी बदलापुरात या नदीच्या किनाऱ्यावर हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. नजीकच्या औद्योगिक वसाहतीतून थेट सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर काळा तवंग पसरला असून त्यामुळेच मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिकांचा मुख्य जलस्रोत आहे. या नदीच्या प्रदबषणाचा मुद्दा आजवर अनेकदा उजेडात आला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने उल्हास नदीच्या प्रदूषणाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना भरमसाट दंडही आकारला होता व प्रदूषणाबाबत उपाययोजना राबवण्याची तंबी दिली होती. मात्र अजूनही या नदीचे प्रदूषण सुरूच आहे. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येते. मंगळवारीही असाच प्रकार दिसून आला असून सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यावर काळा तवंग निर्माण झाला आहे. तसेच या विषारी द्रव्यामुळे नदीकिनारी शेकडो मासे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. बदलापूर चौपाटी ते सोनिवली, एरंजाड आणि वालिवली गावांच्या किनाऱ्यावर या माशांचा खच स्पष्टपणे दिसून येत होता. रासायनिक सांडपाणी सोडल्यानेच मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप सोनियवली ग्रामस्थांनी केला आहे.

दररोज कंपन्यातून विषारी द्रव्ये नदी पात्रात सोडली जातात. मात्र सोमवारी शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद असते. त्यामुळे नदीपात्रात प्रक्रिया केलेले पाणी कमी सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्यात रासायनिक पाण्याचे प्रमाण अधिक झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे येथील स्थानिक नंदकुमार मुंढे यांनी सांगितले आहे. यापूर्वीही अनेक मंगळवारी असे प्रकार समोर आले होते. मंगळवारी नदीचे पाणी प्यायल्याने अनेक म्हशींचे स्वास्थ्य बिघडते, असे गुराखी कैलास यादव यांनी सांगितले.

याबाबत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंचक जाधव यांना विचारले असता, पाहणी करून सांगतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे उल्हास नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळही अनभिज्ञ असल्याचेच समोर आले आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष

उल्हास नदीच्या पाण्याचा वापर पुढे कल्याण तालुक्यातील अनेक गावांत पिण्यासाठी केला जातो. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील अनेक महापालिकांनाही याच नदीतून पाणी दिले जाते. यापूर्वीच पाणी शुद्धीकरण करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदीच्या पाण्याचा दर्जा खालावल्याबाबत कळविले होते. त्यानंतरही उल्हास नदीतील पाणी अशुद्धच राहिले आहे.