७८ जागांसाठी ४८२ उमेदवार रिंगणात; शिवसेना, भाजप आणि साई पक्षात सामना 

उल्हासनगर महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेशी घरोबा तोडल्यानंतर रिपाइंला जवळ करत शिवसेनेने खेळी केली खरी; मात्र सर्वाधिक बंडखोरीचा फटका शिवसेनेलाच बसला. त्यानंतर भाजपच्याही अनेक नाराजांनी अर्ज भरल्याने त्यांचीही कोंडी झाली होती. मात्र अखेरच्या दिवशी बंडोबांना शांत करण्यात सर्वपक्षीयांना यश आले असून ७८ जागांसाठी आता ४८२ उमेदवार रिंगणार आहेत. सर्वपक्षीय रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेना, भाजप आणि साई पक्षात असल्याचे दिसते आहे.

उल्हासनगर महापालिकेत गेली दोन दशके असलेली युती यंदा संपुष्टात येऊन शिवसेना आणि भाजप स्वबळावर िरगणात उतरले आहेत. शिवसेनेने भाजपचा केंद्र आणि राज्यातील मित्र रिपाइंशी युती केल्याने आणि भाजपने टीम ओमी कलानीशी आघाडी केल्याने यंदा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे; मात्र दोन्ही पक्षांना बंडखोरीची लागण झाली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कॅम्प पाचमध्येच शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता.

प्रभाग १९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी भाजपचा हात धरल्याने शिवसेनेची अवस्था केविलवाणी झाली होती. तसेच प्रभाग वीसमध्ये शिवसेनेच्या बंडखोरींनी पॅनल उभे केल्याने तिथेही शिवसेनेला फटका बसणार होता. मात्र प्रभाग २०मधील पाटील कुटुंबीयांच्या बंडाला थंड करण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे प्रधान पाटील, समिधा कोरडे  यांनी अर्ज मागे घेतला आहे, तर भाजपनेही अनेक अपक्षांना शांत करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे मजबूत प्रभागात शिवसेना आणि भाजपने संभाव्य आव्हाने कमी केली आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वीस प्रभागांत ७८ जागांसाठी आता ४८२ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

त्यात शिवसेनेचे ४९, रिपाइंचे १३, भाजप आणि टीम ओमीचे कमळ चिन्हावर लढणारे ७० तर ४ ठिकाणी रासप, २ जागा रिपाइंच्या कवाडे गटाला तर २ ठिकाणी अपक्ष भाजप पुरस्कृत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२, साई पक्षाचे ५९, भारिप बहुजन महासंघाचे १२, मनसेचे २३ तर बसपाचे २२ उमेदवार िरगणात आहेत; मात्र शहरातील खरी लढत भाजप, शिवसेना आणि साई पक्षातच होणार आहे.

सर्वाधिक उमेदवार प्रभाग १८ मध्ये

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार प्रभाग क्रमांक १८ मध्ये आहेत. तब्बल ५४ उमेदवार या प्रभागात आहेत. त्यामुळे येथे मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. सर्वात कमी १० उमेदवार तीन नगरसेवकांच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये आहेत. येथे साई पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढाई होत आहे.