महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नगरसेवकपदी निवडून येऊन अवघे तीन महिने होत नाहीत, तोच मीरा-भाईंदरमधील शिवसेना नगरसेवकाचे पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मीरा गाव येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या एका तीन मजली इमारतीवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. या बांधकामासंदर्भात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक कमलेश भोईर यांना पालिकेने नोटीस बजावली असल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

मीरा गाव येथे तळजमला अधिक तीन मजली अनधिकृत इमारत सोमवारी पालिकेने जमीनदोस्त केली. या इमारतीबाबत महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर यांना नोटीस बजावली होती. ही इमारत विनापरवानगी बांधण्यात आली असून जागेची कागदपत्रे तसेच महापालिकेची परवानगीचे कागदपत्र सात दिवसांच्या आत सादर करावेत. दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर बांधकाम अनधिकृत आहे, असे समजून पालिकेकडून त्यावर कारवाई केली जाईल, असे प्रभाग अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे कमलेश भोईर यांना बजावलेल्या नोटिशीत नमूद केले आहे. सप्टेंबर महिन्यात भोईर यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रशासनाने ही इमारत उद्ध्वस्त केली आहे.

यावरून इमारतीसंदर्भात कोणतीही कागदपत्रे महापलिका प्रशासनाकडे सादर करण्यात आलेली नाहीत हे स्पष्ट होत आहे, तसेच प्रशासनाने कमलेश भोईर यांच्या नावे नोटीस बजावली असल्याने पालिकेच्या दृष्टीने हे अनधिकृत बांधकाम कमलेश भोईर यांनीच केले असल्याचे दिसून येत आहे. कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास अथवा अनधिकृत बांधकाम करण्यास जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकपद रद्द होत असते. त्यामुळेच कमलेश भोईर यांना ही बांधकाम आता अडचणीचे ठरणार आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे बांधकाम नेमके कोणी केले आहे आणि त्याबाबत कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याची माहिती प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्याकडे केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

या बांधकामासंदर्भात मुकेश मेहता यांच्यासह अनेकांनी महापलिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. इमारत उभी असलेली जमीन कमलेश भोईर यांचे वडील यशवंत भोईर यांच्या नावे आहे. त्यामुळे या बांधकामाशी आपल्या कोणताही संबंध नाही, असा दावा कमलेश भोईर यांनी केला असला तरी यशवंत भोईर हे आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर होणाऱ्या बांधकामाला त्यांची मुलेच जबाबदार असल्याने कमलेश भोईर यांच्यासह त्यांचे बंधू राजू भोईर यांचेही नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी मुकेश मेहता यांनी आयुक्तांकडे केली आहे. आता महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते या प्रकरणी काय भूमिका घेतात यावर भोईर यांचे नगरसेवकपदाचे भवितव्य अवलंबून आहे.

नोटिशीनंतरही बांधकाम सुरूच

प्रभाग अधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात बजावलेल्या नोटिशीत इमारत तळमजला अधिक दोन मजले असल्याचे म्हटले आहे. मात्र पाडण्याची कारवाई झाली, त्यावेळी ही इमारत तळमजला अधिक तीन मजले होती. त्यामुळे नोटीस बजावल्यावरही एक मजला अधिक बांधण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच नोटिशीत सात दिवसांची मुदत दिलेली असतानाही प्रत्यक्ष कारवाई तब्बल दोन महिन्यांनंतर झाली. त्यामुळे या बांधकामाला प्रभाग अधिकाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

‘बांधकामाशी कोणताही संबंध नाही’

या इमारतीशी आपला कोणताही संबंध नाही, असे नगरसेवक कमलेश भोईर यांनी स्पष्ट केले. मूळ जागा आपले वडील यशवंत भोईर यांची असून त्यांनी या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू केले, परंतु जून महिन्यात त्यांचे निधन झाले. वडिलांनंतर आपल्यासह आपली आई आणि अन्य तीन बंधू त्यांचे वारसदार आहेत. त्यामुळे महापालिकेने केवळ आपल्या नावे पाठवलेली नोटीस मुळातच चुकीची असून या नोटिशीला आपण उत्तर दिले आहे. उत्तर दिल्यानंतर संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला, परंतु त्यानंतर पालिकेने आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. ही इमारत अनधिकृत असल्याचे घोषित न करताच ती पाडण्याची कारवाई केली आहे, असे भोईर यांनी सांगितले.