वसई पूर्वेकडील राजावली-भोयदापाडा परिसरात असलेल्या अनधिकृत चाळी गुरुवारी महापालिकेने जमीनदोस्त केल्या. यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत, मात्र अनधिकृत बांधकाम करणारे चाळमाफिया मात्र मोकाट आहेत. चाळमाफिया अनधिकृत चाळी बांधतात, पण पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याचा त्रास या चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. त्यामुळे या चाळमाफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वसई पूर्वेला राजावली-भोयदापाडा येथे मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत चाळींचे जाळे पसरलेले होते. हजार ते बाराशे चाळींमध्ये हजारो कुटुंबे राहत होती. त्यातील पाचशे ते सहाशे चाळींवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या कारवाईनंतर चाळींमधील सर्वच कुटुंबे रस्त्यावर आली असून बऱ्याच जणांचे संसार उघडय़ावर आले आहेत. स्वस्त घराच्या लालसेने पै पै जमून रहिवासी या चाळींमध्ये घर घेतात, मात्र ते अधिकृत आहे की नाही याची चौकशी केली जात नाही. पालिकेने नियमानुसार कारवाई केली तर त्यांचे संसार उघडय़ावर पडतात. वसई-विरार शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे तयार झाली आहेत. याकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याने चाळमाफियांचे फावले आहे. अनधिकृत चाळी तयार होत असतानाच त्यांच्यावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसतील, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक श्याम तिवारी यांनी दिली. कर्ज काढून, पै पै पैसा जमवून घर घेतले, पण ते जमीनदोस्त झाले, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

कारवाई सुरूच ठेवणार

पालिकेच्या पथकावर गुरुवारी दगडफेक झाली असली तरी अशा हल्ल्यांना न घाबरता अनधिकृत चाळींवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पालिकेने नियमात राहून ही कारवाई केली असून या प्रकाराला न घाबरता या भागातील जितके अनधिकृत बांधकाम आहे ते सर्व जमीनदोस्त करण्यात येणार आहे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.

१५ हल्लेखोर अटकेत ; अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

वसई पूर्वेकडील अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका पथकावर हल्ला करणाऱ्यांची वालीव पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शुक्रवारी दुपापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांची संख्या ५० हून अधिक असून त्या सर्वाचा शोध सुरू आहे.

वसई पूर्वेच्या भोयदापाडा, राजावली या ठिकाणी भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे करून चाळी बांधल्या आहेत. हजारो कुटुंबे या चाळीत राहत आहेत. अनधिकृत इमारतींनंतर महापालिकेने या चाळींवर आपला मोर्चा वळवला होता. गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक (सीयूसी) आणि प्रभाग समिती ‘जी’चे कर्मचारी या चाळींवर कारवाई करण्यासाठी गेले असता भूमाफियांनी हल्ला घडवून आणला. अचानक तुफान दगडफेक करत पालिकेच्या ताफ्यातील वाहने पेटवण्यात आली. पोलिसांनी अधिक कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवार संध्याकाळपासूनच पोलिसांनी हल्लेखोराची धरपकड सुरू केली होती. शुक्रवारी दुपापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केल्याची माहिती वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. हल्लेखोरांची संख्या ५० हून अधिक आहे. या सर्वावर दंगल, सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोक्का लावण्याची मागणी

या भागात गेल्या काही वर्षांपासून दारा आणि रंधा या भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणात अधिकृत चाळींचे साम्राज्य निर्माण केले असल्याचा आरोप वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे. पोलीस आणि पालिका पथकावर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही बांधकामे उभी राहत होती. त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.