30 September 2020

News Flash

उपेक्षितांचे अंतरंग

सध्या श्रावणमास सुरू आहे. आपल्या देशात काही ठिकाणी प्रत्येक श्रावण पौर्णिमेस श्रावणी हा विधी करण्याची प्रथा आहे.

| September 1, 2015 03:45 am

सध्या श्रावणमास सुरू आहे. आपल्या देशात काही ठिकाणी प्रत्येक श्रावण पौर्णिमेस श्रावणी हा विधी करण्याची प्रथा आहे. धर्मशास्त्रानुसार कोणत्याही धर्मकृत्याला प्रारंभ करण्यापूर्वी यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी म्हणजे श्रावणी. पूर्वी गुरुकुल पद्धतीनुसार अध्ययन होत असल्याने मुलगा आठ वर्षांचा झाल्यावर श्रावण पौर्णिमेचे औचित्य साधून त्याला शिक्षणासाठी गुरुगृही पाठवले जात असे. त्यामुळे श्रावण पौर्णिमेचा दिवस हा संस्कृत दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.अत्यंत चैतन्यपूर्ण आणि कलापूर्ण अशी संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. वेद, रामायण, महाभारत, पुराण, गीता यांसारखे मौल्यवान ग्रंथ या भाषेत आहेत आणि त्यामुळे हजार वर्षांनंतरही ती स्वत:चे महत्त्व टिकवून आहे. संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचा अमूल्य खजिना आहे. खरे तर या भाषेतील हे ज्ञानभंडार जीवनाचे मार्गदर्शक आहे आणि अगदी सध्याच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही हे ग्रंथ आपले महत्त्व टिकवून आहेत. संस्कृत भाषा ही म्हणूनच भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीच्या जतन, संवर्धनासाठी संस्कृत भाषेचे जतन, संवर्धन होणे ही काळाची निकड आहे; पण एकंदरीत समाजातील वास्तव पाहता आणि या भाषेविषयी सर्व स्तरांत दिसून येणारी अनास्था पाहता अनेक प्रश्न निर्माण होतात.

ठाण्यातील सूरवाणी ज्ञानमंदिर शाळेला भेट दिल्यावर या प्रश्नांना पुन्हा सामोरे जातो. संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी र. ग. पराष्टेकरशास्त्री यांनी संस्कृत भाषेची आवड जनसामान्यांत निर्माण व्हावी म्हणून १९५७ साली या पाठशाळेची स्थापना केली. एका वर्षांनंतर ही पाठशाळा संस्कृत भाषा प्रसारिणी सभेशी जोडण्यात आली. संस्कृत भाषेचे अभ्यासक असलेले पराष्टेकरशास्त्री यांचे अध्ययन पुण्यातील श्रीशांकर विद्यापीठातून झाले होते. या पाठशाळेची जर आजपर्यंतची वाटचाल पाहिली, तर काहीशी खडतर स्वरूपाची आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रारंभ मांडवीकर वाडी (गोखले वाडी), पीपल्स एज्युकेशन सोसा. संस्थेच्या नौपाडा मिडल स्कूल, नंतर कौपिनेश्वर मंदिराच्या जागेत, उद्यमवाडी, पुढे मग ७३ मध्ये ही पाठशाळा पद्मनिवास (राममारुती रोड क्रॉस लेन) मध्ये तळमजल्यावर भरू लागली. इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम सुरू झाल्याने शाळा गावदेवी बस डेपोसमोरील इमारतीत गेली ५-६ वर्षे भरत आहे. खरे तर गेल्या ५ दशकांच्या वाटचालीत अनेकविध उपक्रम, कार्यशाळा, कार्यक्रम यांच्या माध्यमातून कार्यरत असलेली ही पाठशाळा काहीशी एकाकी पडली आहे आणि तिच्या व्यथा, समस्या समाजापर्यंत, राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मध्यवर्ती ठिकाणाहून दुसरीकडे शाळा गेल्यावर तर तिच्या अस्तित्वाची दखल ही कोणाला घ्यावीशी वाटत नाही हे वास्तव आहे. सध्या जर्मन, फ्रेंच, जपानी इ. भाषा शिकायला प्राधान्य दिले जाते, कारण भविष्यातील करिअरसाठी तो प्लस पॉइंट ठरतो आणि या भाषा शिकल्यावर संधीचे नवे दालन उपलब्ध होते; पण याच्या तुलनेत सरकारतर्फे संस्कृतसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यकर्ते शालेय/ महाविद्यालयीन पातळीवर काही उपाययोजना करीत आहेत, जेणेकरून पालक/विद्यार्थी या भाषेचाही पर्याय म्हणून विचार करतील असे चित्र दिसून येत नाही. साधारणपणे ९०च्या दशकापर्यंत विचार केला, तर घरोघरी वेगवेगळी स्तोत्रे, श्लोक, गीता/ रामरक्षा इ. पाठांतरावर विशेषत्वाने भर दिला जात असे. संस्कृत भाषेविषयी मोठय़ा प्रमाणावर आदर होता आणि संस्कृतचे महत्त्वही वाटत होते, कारण संस्कृत पाठांतराने स्मरणशक्ती तल्लख होते आणि शुद्ध होते, चांगले संस्कार होतात. संस्कृतचा अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला, तर यामध्ये गणितासारखे पैकीच्या पैकी गुण प्राप्त होतात. परिणामी सुरवाणीमध्ये मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी येत असत आणि शालेय अभ्यासक्रमावर आधारित वर्ग, संस्कृत संभाषण वर्ग, व्याकरणविषयक कार्यशाळा, संस्कृत श्लोकपठण, गीतापठण इ. उपक्रमांना उत्तम प्रतिसाद प्राप्त होत असे. जडणघडणीच्या काळात आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून पालक या उपक्रमांकडे पाहत असत, त्यामुळे वर्षभरातील या उपक्रमांप्रमाणे उन्हाळी सुट्टीत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातही मुलांची गर्दी होत असे. या शिबिराचे वैशिष्टय़ म्हणजे हस्तकला, चित्रकला, विविध खेळ, गोष्टी, गाणी, श्लोक इ. माध्यमांतून मुलांना कळेल अशा पद्धतीने, त्यांना रंजक वाटेल अशा स्वरूपात संस्कृतमधून संभाषण केले जायचे. याचप्रमाणे गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, गणपती पूजाविधी इ. विविध विषयांवरील कार्यशाळांचेही सातत्याने आयोजन केले जात असे. ठाण्यामध्ये गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार शिबीर आयोजित करण्याचे श्रेय या पाठशाळेलाच जाते. गर्भवती स्त्रियांसाठी आयोजित या शिबिरात महाभारतातील खिलपर्वातील संतानगोपालस्तोत्राचे केले जाणारे पठण हे या शिबिराचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.९वीचा अभ्यासक्रम बदलल्यावर शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर सत्राचा लाभ ठाण्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांनी घेतला होता. १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबीरही पाठशाळेतर्फे आयोजिण्यात आले होते. गेली दहा वर्षे ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संस्कृत परीक्षांना बसवण्याच्या दृष्टीने पाठशाळेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. पूर्वेकडील पं. राम मराठे उद्यानामधील जागेत विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे संस्कारवर्गाचा उपक्रम राबवण्यात आला. मन:शांतीसाठी ठाण्यातील काही शाळांमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या पाठशाळेकडील ग्रंथालयात सर्ववेद, उपनिषदे, पुराण, रामायण, धर्मशास्त्रांचा इतिहास, वेदान्त, पारिजात, धर्मसिंधू, राष्ट्रीय संस्कृत संस्थान या संस्थेच्या संस्कृत मार्गदर्शनपर पुस्तकांची मालिका इ. मार्गदर्शनपर असा अनमोल ग्रंथ आणि पुस्तकांचा खजिना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2015 3:45 am

Web Title: underdog insights
Next Stories
1 जगाला नेत्र पुरविण्याची भारताची क्षमता
2 मुंबईतील कचऱ्याचा त्रास सोसणारे ठाणेकर
3 डोंबिवली एसआयए महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Just Now!
X