News Flash

‘रुग्णालयांतील विविध यंत्रणांची तपासणी करणे आवश्यक’

करोनाकाळात रुग्णालयातील विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे.

ठाणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन सुरक्षा, प्राणवायू आणि विद्युत यंत्रणांची तातडीने तपासणी करावी. तसेच करोना उपचारांसाठी निश्चित केलेल्या पद्धतीचाच अवलंब करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवारी खासगी रुग्णालय प्रमुखांच्या बैठकीत दिले.

रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णाची योग्य ती माहिती त्याच्या नातेवाईकांना देणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधत रुग्णांकडून योग्य तीच बिलाची रक्कम वसूल करावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये मंगळवारी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांच्या सुरक्षेसंदर्भात आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, टास्क फोर्सचे प्रतिनिधी आणि सर्व खासगी रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित

होते. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्राणवायू पुरवठय़ासाठी महापालिकेच्या करोना रुग्णालयांवर तसेच खासगी रुग्णालयांवर मोठय़ा प्रमाणावर ताण पडत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य ते उपचार देण्यासोबतच रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन सुयोग्य स्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये यासाठी रुग्णालयांमधील अग्निशमन सुरक्षा, प्राणवायू तसेच विद्युत पुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने एका व्यक्तीची नियुक्त करावी. तसेच प्राणवायू पुरवठय़ाबाबतच्या अडचणीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे निर्देश आयुक्त डॉ. शर्मा यांनी बैठकीत दिले.

करोनाकाळात रुग्णालयातील विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या तसेच त्यांच्या नातलगांचा वावर असतो अशा वेळेस या ठिकाणी कोणत्याही कारणाने अपघात घडला तर जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे होणारे अपघात टाळणे शक्य होणार आहे. यासाठी विद्युत संच मांडण्याचे निरीक्षण करण्यासाठी मानक कार्यप्रक्रिया आणि सूची तयार करण्यात येणार आहे.

रुग्णालयांमधील प्राणवायू साठा, प्राणवायू वितरण प्रणाली अद्ययावत ठेवण्यासोबतच प्राणवायूसंदर्भात काही अडचणी आली तर, महापालिकेशी समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रुग्णालयांत आवश्यकतेनुसार सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपकरणे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे तसेच आग प्रतिबंधक उपकरणे व कार्यप्रणाली कार्यान्वित असण्याबाबत दक्षता घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

प्राणवायूबाबत सतर्क राहा

सद्य:स्थितीत प्राणवायूची गरज मोठय़ा प्रमाणात असून आवश्यकतेनुसार त्याचा साठा करून त्याचे सुयोग्य वितरण करावे. रात्री-अपरात्री रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्राणवायू साठा संपण्याअगोदरच आगाऊ  कळविण्यात यावे. त्यानुसार तातडीची उपाययोजना करणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे प्राणवायूबाबत सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त डॉ. शर्मा यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:00 am

Web Title: various systems in hospitals need to be inspected zws 70
Next Stories
1 ‘करोना रुग्णालयाच्या आवारात अग्निशमन दलाचे बंब तैनात ठेवा’
2 Corona : ठाणे जिल्हा रुग्णालय बनले ‘जीवनदायी’!
3 चार मृत्यूंनी ठाणे हादरले!
Just Now!
X