राज्यभर सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानाचा फटका पुणे, नाशिक जिल्ह्य़ातील भाजीपाला उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे  आषाढ महिन्यातच भाज्यांच्या दरांनी उसळी घेतली आहे. येत्या दहा दिवसांत व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यास सुरुवात होत असून त्या काळात भाजीपाल्याची मागणी वाढून दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत कोबी, फ्लॉवर, सुरण, शिमला मिरची अशा भाज्यांच्या घाऊक बाजारांतील दरांत किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे तर, किरकोळ बाजारात या भाज्या आधीच्या तुलनेत १०-२० रुपये चढय़ा दराने विकल्या जात आहेत. टोमॅटोच्या दरातही घाऊक बाजारात प्रति किलो ७ ते ८ रुपये तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरात नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. गेल्या दोन आठवडय़ांपासून नाशिक जिल्ह्य़ाला पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील काही रस्तेही पाण्याखाली गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्ह्य़ातील काही रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचा परिणाम भाजीपाल्याच्या वाहतुकीवर झाला असल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक येथून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे.

तसेच पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने तेथूनही येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्याचे वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले

आहे.  दररोज वाशी आणि कल्याण कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या ५०० गाडय़ा येतात. मात्र, सध्या गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हे प्रमाण १०० ते १५० गाडय़ांनी कमी झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सर्वच प्रमुख भाज्यांचे दरही वाढू लागले आहेत.

कोथिंबिरीच्या दरात घसरण

जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोथिंबिरीच्या एका जुडीने घाऊक बाजारात शंभरी गाठली होती. मात्र, गेल्या आठवडय़ापासून कोथिंबिरीची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. तरीही किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ८० रुपयांना विकली जात आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने नाशिक आणि परिसरातून येणाऱ्या भाज्यांच्या गाडय़ांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत. तसेच पुढील एक ते दोन आठवडे सर्व भाज्यांचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे.

– शंकर पराड , किरकोळ भाजी विक्रेता, ठाणे