25 February 2021

News Flash

लोकवर्गणी, श्रमदानातून ग्रामस्थांकडून विहिरीची बांधणी

वसई तालुक्यातील कसराळी हे गाव दोन हजारांहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वसईजवळील कसराळी गावच्या रहिवाशांचा रामबाण उपाय

एखाद्या समस्येवर हताश न होता उपाय शोधला की मात करता येते, हे वसईजवळील कसराळी या गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. वसई-विरार परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र या टंचाईवर मात करण्यासाठी कसराळी ग्रामस्थांनी रामबाण उपाय शोधला. सर्व गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली आणि श्रमदानातून मोठी विहीर बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या गावाला आता कधीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा ग्रामस्थांना आशावाद आहे.

वसई तालुक्यातील कसराळी हे गाव दोन हजारांहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांनी गेल्या ३५ वर्षांपासून टँकरवर आपल्या पाण्याची तहान भागवत पाण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या आहेत. हे गाव खाडीशेजारी असल्याने गावात जमिनीत केवळ खारे पाणी लागते. गावातील ज्या पारंपरिक विहिरी आहेत, त्या फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठतात. या गावात चार-पाच विहिरी आहेत. त्यातील पाण्यावरच या गावाचा उदरनिर्वाह चालतो. गावातील पाणी समस्येसाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासनाचे  उंबरठे झिजवले आहेत, पण हाती केवळ निराशाच आली. गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असे, तसेच टँकरसाठी रात्रभर जागे राहावे लागायचे. या गावात महापालिकेची नळाची पाइपलाइन तर आली, पण त्याला कधीच पाणी आले नाही. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून आपल्या श्रमदानातून एक मोठी विहीर बांधण्याचे काम सुरू केले आहे.

विहिरीसाठी श्रमदान

  • गावातील स्थानिक देवस्थानची जागा घेऊन ग्रामस्थांनी एक मोठी विहीर बांधण्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वीपासून सुरू आहे.
  • यासाठी २५ लाख खर्च अपेक्षित आहे. यासाठी गावकरी प्रत्येक जोडप्यामागे एक हजार  रुपये याप्रमाणे दरमहा वर्गणी गोळा करून ही विहीर बांधत आहेत.
  • दर रविवारी ग्रामस्थ विहीर खोदण्याच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करतात. त्यात लहान मुले, तरुण, महिला, पुरुष या सर्वाचा समावेश असतो.
  • या गावकऱ्यांनी ही विहीर खणताना जी माती आणि दगड लागले ते विकून अधिक पैसा मिळवला आणि स्वत: गावकरी श्रमदान करत असल्याने मजुरीसाठी लागणारा निधीही वाचवला.
  • या विहिरीजवळच एक डोंगर आहे, त्या डोंगराजवळ एक पाझरतलाव तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षभर या विहिरीला पाणी राहणार आहे.

या गावातील महिलांनी गेल्या ३५ वर्षांपासून पाण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. हंडाभर पाण्यासाठी अनेक मैल पायपीट केली आहे. गावात पाण्यामुळे सतत भांडणे होत असत. इतकेच नाही तर गावात कुणी आपली मुलगी देण्यास तयार होत नसत. पण आता या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. येणाऱ्या सुनांना आता पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही.

– किसान किणी, ग्रामस्थ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:19 am

Web Title: villagers build wells in vasai to solve water problem
टॅग : Vasai
Next Stories
1 जमीनमालक खुशीत, रहिवासी भयभीत!
2 बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा ‘ड्राय डे’ला विरोध
3 प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने आदिवासी तरुणीची आत्महत्या
Just Now!
X