उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन, डीजे, वाद्यांचा दणदणाट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरी ठाण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांत मंडळांकडून सर्रास डीजेचा वापर करण्यात आला. दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाची पातळी तब्बल १०० डेसिबलपेक्षा जास्त होती. डीजे आणि बॅन्जोच्या तालावर थिरकत काही मंडळांनी रस्त्यावर अक्षरश: धिंगाणा घातल्याने विसर्जनाच्या दिवशी शहराच्या ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली.

रुग्णालयांच्या आवारातही डीजेचा आवाज बंद करण्याची संवेदनशीलता मंडळांनी दाखवली नाही. त्यामुळे शांतता क्षेत्रांतही कानठळ्या बसत होत्या. मिरवणुकांच्या आजूबाजूला पोलीस तैनात करण्यात आले असले तरी किमान रुग्णालय आवारात आवाज बंद करण्याच्या सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या नसल्याची खंत काही रुग्णालयांतील डॉक्टरांनी व्यक्त केली.

या वर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी असल्याचे जाहीर केले होते. मात्र यंदाच्या मिरवणुकीतही न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. राम मारुती रस्ता, गोखले रस्ता, पाचपाखाडी, तीन पेट्रोल पंप, वर्तकनगर या परिसरांत दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी आवाजाची पातळी ९५ डेसिबलच्या वर पोहोचली होती. तीन पेट्रोल पंप परिसरात काही रुग्णालये असली तरी या भागांतील मिरवणुकांमध्ये बॅन्जो, ढोल-ताशा आणि मोठे ध्वनिवर्धक वापरण्यात आल्याने आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत पोहचली होती. सायंकाळी आवाजाची पातळी कमी जाणवत असली तरी रात्री उशिरा मिरवणुका सुरू झाल्यावर या परिसरातील इमारती, रुग्णालयांना आवाजाचा प्रचंड त्रास झाला. रिव्हायवल रुग्णालय, डॉ. बिर्ला हायटेक युरॉलिजिकल सेंटर, डॉ. केळकर रुग्णालय, निपुण रुग्णालय या परिसरातही फटाके, डीजेचा कर्णकर्कश आवाज असल्याने येथील आवाजाची पातळी ९५ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचली होती.

उच्च न्यायालयाचे आवाजाच्या पातळीविषयी कडक नियम असूनही काही मिरवणुकांमध्ये यंदा वाहनांवरच ऑर्केस्ट्रा सुरू होता. काही महाविद्यालयीन तरुणांकडून रुग्णालय आवारात जनजागृती करण्यात येत होती. मात्र तरीही गोंगाट कायम होता.

यंदाही डीजे, डॉल्बीचा आवाज सर्रास सुरू होता. या मिरवणुकीत पोलीस उपस्थित असले तरी आवाज कमी करण्याच्या किंवा रुग्णालय परिसरात डीजे बंद करण्याच्या कोणत्याही सूचना त्यांनी दिल्या नाहीत.

– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of the rules of the high court in thane
First published on: 19-09-2018 at 03:02 IST