विरारमध्ये आठ महिन्यांच्या मुलीची अडीच लाखांत विक्री करण्याचा प्रकार विरार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरसहीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलीची सुखरूप सुटका करून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं . आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विरारमध्ये काही जण एका आठ महिन्यांच्या मुलीला विकण्यासाठी येणार असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर यांना मिळाली होती. विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने विरार पश्चिमेच्या बस स्थानकात सापळा रचला होता. यावेळी मुलीला विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यात मंजू मंडल (३७) संजित मंडल (४०), अनिता बने (५०), डॉ.जितेन बाला (४६) या चौघांचा समावेश आहे

याबाबत माहिती देताना उपनिरीक्षक अभिजित टेलर यांनी सांगितले की, “आरोपी मंजू आणि संजित मंडल हे पती पत्नी असून मूळचे कोलकात्यात राहणारे आहेत.. विक्रीसाठी आणलेली मुलगी आरोपी मंजूच्या नात्यातील आहे. मुलीची आई प्रसूतीदरम्यान वारल्यानंतर त्यांनी मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नालासोपारा मधील अनिता बने आणि आयुर्वेदीक डॉक्टर जितेन बाला यांनी मध्यस्थी केली. अडीच लाखांमध्ये मुलीच्या विक्रीचा सौदा ठरला होता”.