उपाहारगृह, बीअर बारमध्ये पोलिसांची कारवाई; दोघांना अटक, सात फरार

ग्राहकांचे बनावट एटीएम कार्ड बनवण्यासाठी बीअर बार आणि उपाहारगृहातील वेटरचा वापर करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मुंबई, ठाण्यापाठोपाठ वसई-विरारमध्येही या टोळीने वेटरच्या माध्यमातून ग्राहकांच्या एटीएम कार्डाचे क्लोनिंग केले आहे. अशा क्लोनिंग केलेल्या कार्डाने ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करण्यात आले आहेत. विरार पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. मात्र कारवाईच्या भीतीने विरारमधील सात वेटर फरार झाले आहेत.

बँकेतील ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी ठकसेन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. पूर्वी एटीएम केंद्रात स्कीमर नावाचे उपकरण लावून ग्राहकांच्या एटीएम कार्डाचे क्लोनिंग केले जायचे आणि मग बनावट एटीएम कार्ड बनवून पैसे लंपास केले जायचे. एटीएम सुरक्षा अधिक कडक झाल्याने आता या ठकसेनांनी नवीन पद्धत सुरू केली आहे. उपाहारगृह आणि बीअर बारमध्ये काम करणाऱ्या वेटरचा वापर करण्यात येऊ लागला आहे. ठकसेनांकडून वेटरला स्कीमर उपकरण देण्यात येते. उपाहारगृहात जेवल्यानंतर ग्राहक बिल चुकवण्यासाठी वेटरकडे एटीएम कार्ड देऊन पासवर्ड सांगतात. त्याचा गैरफायदा घेत वेटर एटीएम कार्ड स्कीमरमध्ये टाकून त्याचा डाटा चोरी करायचे. ग्राहकाने सांगितलेला पासवर्ड लिहून ठेवायचे. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी चोरलेल्या डेटाच्या आधारे एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून पैसे काढून घेत. विरारमध्ये काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या एटीएम कार्डातून अशाप्रकारे पैसे लंपास करण्यात आले होते. विरार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ‘आश्रय बार’च्या एका वेटरला अटक केली.

याबाबत माहिती देताना विरारचे पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले की, अनेक ग्राहक बारमध्ये मद्यपान केल्यावर वेटरला बिल चुकवण्यासाठी एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक देतात. ते या ठकेसनांनी पाहिले आणि वेटरचा या कामासाठी वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी वेटरला स्कीमर उपकरण पुरवले. ग्राहक ज्या वेळी एटीएम कार्ड आणि पासवर्ड द्यायचा त्या वेळी वेटर गुपचूप स्कीमर उपकरणात कार्ड टाकून डेटा कॉपी करायचे. नंतर त्या ग्राहकांचा पिन क्रमांकही लिहून ठेवायचे. नंतर या टोळीचा म्होरक्या क्लोन केलेल्या कार्डाच्या आधारे बनावट कार्ड बनवून काही महिन्यांनी उत्तरेकडील राज्यातील एटीएममधून रक्कम लंपास करायचा. या मोबदल्यात वेटरला लंपास केलेल्या रकमेतील २० टक्के रक्कम दिली जायची. ज्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास व्हायचे, त्याला मात्र याबाबत काहीच आठवत नसायचे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी मुलुंड येथून अशाच प्रकारे ग्राहकांच्या एटीएम कार्डाचे क्लोनिंग करणाऱ्या तीन वेटरना अटक केली होती. त्यांनी ६४ ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केले होते. पुण्यातही ही टोळी सक्रिय आहे.

काय काळजी घ्यावी?

  • आपले एटीएम कार्ड कधीच कुणाला स्वाइप करायला देऊ नये.
  • हॉटेलमध्ये बिल चुकते करताना स्वाइप मशीनमध्ये स्वत: कार्ड टाकावे. आपला पासवर्ड कुणी बघत नाही ना याची खात्री करावी
  • एटीएम कार्डचा पासवर्ड सतत बदलत राहावा.
  • पासवर्ड कधीच कुणाला सांगू नये.
  • मद्यपान केल्यावर ग्राहक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

हॉटेलचालकांकडे चौकशी

विरार पोलिसांनी दोन वेटरना अटक केल्यानंतर सात हॉटेलांतील वेटर फरार झाले आहेत, तर वसईमधील काही हॉटेलातील वेटर फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता पोलीस या हॉटेलचालकांकडे चौकशी करत आहेत. ज्या ग्राहकांचे पैसे अशा पद्धतीने लंपास झाले असतील, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या हा राजविर सिंग असून तो झारखंड या नक्षलग्रस्त भागातील आहे. ज्या खात्यात पैसे भरले आहे, ते खाते पोलिसांनी गोठवले आहे.